हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात शुभमन गिल या युवा फलंदाजाचे पदार्पण झाले. या सामन्यात गिलला फक्त 9 धावा करता आल्या, पण या 9 धावा करूनही गिलने भारताच्या विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे.
गिलने युवा विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. या विश्वचषकात सर्वाधिक धावाही गिलच्या नावावर होत्या. त्याची ही नेत्रदीपक कामगिरी पाहून त्याला विराट कोहलीच्या जागी संघात स्थान देण्यात आले. दस्तुरखुद्द कोहलीनेही गिलने सामन्यापूर्वी तोंडभरून कौतुक केले होते. त्यामुळेच कोहलीच्या जागी संघात गिलची निवड करण्यात आली.
गिलचा हा पहिला सामना होता. या सामन्यात गिल दमदार फलंदाजी करेल, असे साऱ्यांना वाटले होते. पण या सामन्यात गिलला फक्त नऊ धावाच करता आल्या. पण नऊ धावा करूनही गिलने कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे.
गिलने कोणता कोहलीचा विक्रम मोडीत काढला...
सर्वात कमी वयामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणारा गिल हा तिसरा खेळाडू ठरला आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर 19 वर्षे आणि 287 दिवसांचा असताना पदार्पण केले आहे. गिलने कोहलीचा विक्रम मोडीत काढला असून त्याने 19 वर्षे आणि 145 दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले आहे.
भारताचा लाजीरवाणा पराभव
ट्रेंट बोल्टचा भेदक मारा आणि त्याला अन्य गोलंदाजांकडून मिळालेली साथ याच्या जोरावर न्यूझीलंडने चौथ्या वन डे सामन्यात भारताला 8 विकेट राखून पराभूत केले. भारताचे 93 धावांचे माफक लक्ष्य न्यूझीलंडने 14.4 षटकांतच पूर्ण केले. हेन्री निकोल्स ( 30) आणि रॉस टेलर ( 37) यांनी किवींना विजय मिळवून दिला. चौथ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांच्यासमोर शरणागती पत्करली. भारताचा संपूर्ण संघ 92 धावांत तंबूत परतला. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला युजवेंद्र चहल ( 18*) हा या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ट्रेंट बोल्टने सलग दहा षटकं टाकून 4 निर्धाव षटकांसह 21 धावा देताना पाच विकेट घेतल्या. त्याला कॉलीन डी ग्रँडहोमने ( 3/26) चांगली साथ दिली.
Web Title: India vs NZ, 4th ODI: Shubhman Gill breaks virat Kohli's record even after scoring nine runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.