IND vs PAK, World Cup 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच भारतात या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. आधीच ठरल्याप्रमाणे ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. नव्या वेळापत्रकात भारत-पाकिस्तान सामन्यासह 9 सामन्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 15 ऐवजी एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या दिवशी बरेच पाहुणे मंडळी सामना पाहण्यासाठी येतील असा अंदाज आहे. त्यामुळे चक्क हॉटेल रूमचे एका दिवसाचे भाडे तब्बल लाखांच्या पार पोहोचले आहे.
हॉटेलच्या एका रूमचे भाडे अडीच लाख रुपयांवर...
विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होताच अहमदाबादमध्ये या सामन्याची तयारी वेगाने सुरू झाली आहे. येथे चाहत्यांनी हॉटेलच्या खोल्यांचे बुकिंग सुरू केले आहे. त्यामुळेच येथे महागाई गगनाला भिडू लागली आहे. हॉटेलच्या खोलीचे भाडे प्रचंड वाढले आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये एका दिवसाचे खोलीचे भाडे 20,000 ते 2.5 लाख रुपये झाले आहे. १५ ऑगस्टपासून तिकीट बूकिंग सुरू झाले असून त्यानंतर आता या गोष्टींना वेग आला आहे.
प्रेसिडेन्शिअल सूटमध्ये बुकींग 1 लाख ते 2.5 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामागचे मुख्य कारण क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याची अधीर प्रतीक्षा असल्याचे मानले जात आहे. हॉटेल असोसिएशनचा असा विश्वास आहे की एकदा सामन्याची तिकिटे कन्फर्म झाली की, अहमदाबादच्या 100 किमी अंतरावरील सर्व लहान-मोठी हॉटेल्स आणि शेअरिंग फ्लॅट्सही बुक केले जातील. सामन्यांसाठी सुमारे 30-40 हजार लोक गुजरात बाहेरून येतील. त्यामुळे भाव गगनाला भिडले आहेत.
विमान भाड्यातही ५ पट वाढ
हॉटेल्सशिवाय फ्लाइट्सबद्दल बोलायचे झाले तर त्या काळात हवाई प्रवासही महाग झाला आहे. 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान मुंबई आणि दिल्लीहून अहमदाबादला येणाऱ्या बहुतांश फ्लाइट्सच्या किमती 10 हजार ते 25 हजारांपर्यंत पोहोचल्या आहेत. ही किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. सामान्य दिवसात हे भाडे अडीच ते पाच हजारांपर्यंत असते. सामन्याच्या तिकिटांची विक्रीही सुरू झालेली नसताना ही स्थिती आहे.