IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषक २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याला अजूनही आठवड्याभराचा वेळ शिल्लक आहे. पण दोन्ही संघांचे चाहते आधीच आमनेसामने असल्याने २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सामन्यासाठी वातावरण तयार होऊ लागले आहे. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आशिया कपमधून बाहेर पडला आहे. त्याबद्दल बोलताना पाकचा माजी क्रिकेटपटू वकार युनूसने 'ही टीम इंडियासाठी दिलासादायक गोष्ट' असल्याचे म्हटले होते. आता भारताच्या इरफान पठाणने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
इरफान पठाणने रविवारी एक ट्विट केले, ज्यामध्ये त्याने लिहिले की, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यावेळी आशिया कप खेळत नाहीत. ही इतर संघांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इरफानचे हे ट्विट वेगाने व्हायरल झाले आहे. टीम इंडियाचा माजी फलंदाज वासिम जाफरनेही याचा आनंद घेतला आणि एक मीम ट्विट केले व लिहिले की, तुम्ही काहीही बोलू नका, पण मी ऐकले. या दोघांच्या या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांनी पाकिस्तानी संघाला चांगलेच ट्रोल केले.
जेव्हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आशिया चषक २०२२ मधून बाहेर पडल्याची बातमी आली, तेव्हा पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूसने एक ट्विट केले. त्याने आपल्या ट्वीटच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंवर निशाणा साधला होता. वकार युनूसने लिहिले होते की, शाहीन आफ्रिदी खेळत नाही ही टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरसाठी दिलासादायक बाब आहे. त्यानंतर भारतीय चाहत्यांनी वकार युनिसला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले आणि प्रत्युत्तरही दिले.