Asia Cup 2022, India vs Pakistan : भारत-पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी India vs Pakistan यांच्यातली लढत पाहायला मिळणार आहे. मागील वर्ल्ड कप स्पर्धेत बाबर आजमनच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत भारतावर विजय मिळवण्याचा पराक्रम केला होता. पण, आता भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्याची परतफेड करण्यासाठी सज्ज झाला आहे. २०१६नंतर प्रथमच आशिया चषक ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे आणि या स्पर्धेच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या.
आयपीएल २०२२नंतर भारतीय संघ पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयर्लंड दौऱ्यावर दोन ट्वेंटी-२० ( २६ व २८ जून) साने खेळणार आहे. तिथून इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी, तीन ट्वेंटी-२० व तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तेच ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. याच्याही तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत.
२०१८मध्ये वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक खेळवण्यात आला होता. पण, यंदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्याचा निर्णय झाला आहे. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा श्रीलंकेत पार पडणार असल्याचे शनिवारी आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या बैठकित ठरवण्यात आले. तसेच बीसीसीआयचे सचिव जय शाह हे ACCच्या चेअरमनपदी २०२४ पर्यंत कायम राहणार आहेत. आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात दोन सामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत भारतीय संघ पाच सामने खेळणार आहे.
२३ ऑक्टोबरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल. भारत आणि पाकिस्तान हे सुपर १२मध्ये एकाच गटात आहेत. यांच्यासह दक्षिण आफ्रिका, बांगलादेश व दोन क्वालिफायर संघही ग्रुप २ मध्ये आहेत.