Team India, T20 World Cup 2022: पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियन भूमीवर T20 विश्वचषक 2022 सुरु होत आहे. T20 विश्वचषक १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार असला तरी खरी लढत २२ ऑक्टोबरपासून सुरू होईल. तेव्हापासून सुपर-12 फेरीचे सामने सुरू होतील. सुपर-12 फेरीचा पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात २२ ऑक्टोबरला होणार आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या स्पर्धेची सुरुवात करणार आहे. या सामन्यात एक विशिष्ट योगायोग जुळून येणार असून तसे झाल्यास भारताला विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी वेगळीच ऊर्जा मिळेल.
ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) हा सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडिया गेल्या टी-20 वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासोबत ३७ वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट योगायोगाने पुन्हा घडत आहे. १९८५ साली ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर क्रिकेटची 'बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप' झाली होती. 'मिनी वर्ल्ड कप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या स्पर्धेत भारताने मेलबर्नच्या याच मैदानावर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून आपल्या स्पर्धेची सुरुवात केली. नंतर मेलबर्नमध्येच भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाला होता. त्यात सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ट्रॉफीवर कब्जा केला होता. यावेळीही असा योगायोग घडावा अशी भारतीय खेळाडूंची आणि चाहत्यांची नक्कीच इच्छा असेल.
१९८५च्या त्या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने खूप चांगले प्रदर्शन केले होते आणि संघ अजिंक्य होता. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेटने पराभव केला होता. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडलाही हरवले होते. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव केला होता. तर फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला मात देत विजेतेपद जिंकले होते.