वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत १५ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान हा महामुकाबला होणार आहे. त्याआधी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आशिया चषक २०२३ ( Asia Cup 2023 ) स्पर्धेत दोन वेळा भिडणार आहेत. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, परंतु BCCI ने संघ पाठवण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा पाकिस्तान-श्रीलंका अशा दोन देशांत पार पडणार आहे. यजमान पाकिस्तानमध्ये केवळ चार सामने होतील, तर ९ सामने श्रीलंकेत होतील. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) जास्त सामन्यांसाठी अडून बसले आहेत आणि त्यामुळे आशियाई क्रिकेट परिषदेला ( ACC) वेळापत्रक जाहीर करण्यास विलंब होतोय. पण, IND vs PAK सामन्यांच्या तारखा समोर आल्या आहेत.
भारत, पाकिस्तानसह बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका आदी संघ आशिया चषक स्पर्धेत खेळणार आहेत. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध दोन वेळा साखळी सामन्यात खेळतील. यानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातही साखळी सामन्यात दोन लढती होतील आणि हाती आलेल्या वृत्तानुसार २ सप्टेंबर आणि १० सप्टेंबर या भारत-पाकिस्तान सामन्यांच्या तारखा ठरल्या आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या लढती श्रीलंकेतील डाम्बुला किंवा कँडी येथे खेळवल्या जाणार आहेत.
दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचल्यास आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान अशा तीन लढती चाहत्यांना पाहायला मिळतील. पाकिस्तानचा संघ ३० किंवा ३१ ऑगस्टला नेपाळविरुद्ध पहिली मॅच खेळले.
पीसीबीच्या कार्यकारी समितीचे प्रमुख झका अश्रफ यांनी आशिया चषक स्पर्धेसाठी सर्वप्रथम हायब्रिड संकल्पनेला महत्त्वपूर्ण विरोध दर्शवला होता. त्यांनी नंतर पुष्टी केली, आशिया चषक स्पर्धेसाठी "हायब्रीड मॉडेल" घेऊन बोर्ड एसीसी आणि त्याच्या सदस्यांना दिलेल्या वचनाचा सन्मान करेल. अशरफला ही संकल्पना पूर्णपणे मान्य नसली तरी पीसीबी मागील व्यवस्थापनाच्या निर्णयाचा आदर करेल असे त्यांनी स्पष्ट केले.