ICC U-19 World Cup: ऑस्ट्रेलियाने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कांगारूंनी पाकिस्तानचा ११९ धावांनी पराभव केला. आता उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यातील शनिवारी होणाऱ्या सामन्यातील विजेत्या संघाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचा पाकिस्तानने पराभव केला असता आणि भारताने बांगलादेशवर विजय मिळवला असता, तर उपांत्य फेरीत भारत पाक महामुकाबला अनुभवण्यासाठी संधी चाहत्यांना मिळाली असती. पण ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेतूनच बाहेर फेकले.
पाकिस्तानला २७७ धावांचं आव्हान पेलवलं नाही!
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने सात गडी गमावून २७६ धावा केल्या होत्या. सलामीवीर टीग वायली ७१ आणि कोरी मिलरने ६४ धावा केल्या. या दोन फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी झाली. दुसरा सलामीवीर कॅम्पबेल केलवेने ४१ आणि कर्णधार कूपर कॉनोलीने ३३ धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार कासिम अक्रमने तीन तर अवैस अलीने दोन गडी बाद केले.
आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ ३५.१ षटकात अवघ्या १५७ धावांवर गारद झाला. मेहरान मुमताजने सर्वाधिक २९ धावा केल्या. त्याचवेळी अब्दुल फसीहने २८ आणि इरफान खानने २७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून विल्यम साल्झमनने सर्वाधिक तीन खेळाडू माघारी पाठवले.