ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडणार आहेत. त्यामुळे क्रिकेट रसिकांना मेजवानी मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ २४ ऑक्टोबरला आमनेसामने उभे ठाकतील. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील टक्कर क्रिकेट चाहत्यांना पाहता येईल. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा यूएईत खेळवली जाणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच आता वातावरणही तापू लागले आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम व जलदगती गोलंदाज हसन अली यांनी टीम इंडियाला नमवण्याचा दावा केला आहे.
'२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसारखी कामगिरी करू अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मध्ये भारताला हरवू'
२०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं ज्याप्रकारे टीम इंडियाला पराभूत केलं होतं, तसाच खेळ केल्यास ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्येही भारतावर विजय मिळवू शकतो, असा दावा हसन अलीनं केला. पण, त्या पराभवानंतर टीम इंडियानं २०१८च्या आशिया चषक ( ५० षटक) स्पर्धेत व २०१९च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये त्यांच्यावर विजय मिळवला आहे. तो म्हणाला,''२०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये आम्ही त्यांना पराभूत केलं होतं आणि तो काळ आमच्यासाठी चांगला होता. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला पराभूत करण्याचा प्रयत्न करू. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू. भारताविरुद्धच्या सामन्यात दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या प्रचंड अपेक्षा असतात आणि त्यामुळे दडपणही असतंच ''
आमच्यापेक्षा टीम इंडियावरच असेल अधिक दडपण; पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमचा दावा
आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया पहिल्याच सामन्यात प्रचंड दडपणाखाली असेल, असे मत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं व्यक्त केलं आहे. तो म्हणाला, ''ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानपेक्षा टीम इंडिया अधिक दडपणाखाली असेल. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी भारतीय खेळाडू बराच काळ एकत्र ट्वेंटी-२० सामने खेळणार नाहीत. ते आयपीएलमध्ये विविध फ्रँचायझीमधून खेळणार आहेत. सध्या ते कसोटी मालिका खेळत आहेत आणि त्यानंतर ते फ्रँचायझी लीगमध्ये व्यग्र होतील. यूएई हे आमच्यासाठी घरचं मैदानच आहे आणि आम्ही १०० टक्के देण्याचा प्रयत्न करू.''
पाकिस्तानला हलक्यात घेऊ नका, ते खूप धोकादायक आहेत; गौतम गंभीरचा अन्य संघांना सल्ला
भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं आगामी ट्वेटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाला कमी लेखण्याची चूक करू नका, असा सल्ला अन्य संघांना दिला आहे. तो म्हणाला,''हा खूप धोकादायक संघ आहे. त्यांचा अंदाज बांधणे नेहमीच अवघड जाते आणि त्यामुळेच तो पाकिस्तान क्रिकेट संघ आहे. ते कोणालाही पराभूत करू शकतील आणि कोणाकडूनही हरूही शकतील. ते असेच क्रिकेट खेळत आले आहेत. हे वर्षांनुवर्षाचं आहे आणि त्यांच्याकडे चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत.''
गौतम गंभीरनं पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी सूचवली टीम इंडियाला प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्थी, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.