India vs Pakistan, ICC ODI World Cup 2023 Rohit Sharma Press Conference : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील ज्या सामन्याची चाहत्यांना प्रतीक्षा होती, तो अखेर उद्या अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी उद्या विजयी हॅटट्रिकच्या निर्धाराने मैदानावर उतरतील. दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी ही चांगली झालेली आहे, परंतु भारताविरुद्ध वन डे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची पाटी ७-० अशी कोरी आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर भारताचे पारडे जड आहे, परंतु कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma) तसं वाटत नाही. त्यातच त्याने उद्याच्या सामन्यात शुबमन गिल ( Shubman Gill) खेळण्यासाठी ९९% टक्के खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे जाहीर केले.
शुबमनला डेंग्यूमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागले होते आणि त्याच्या जागी संधी मिळालेल्या इशान किशनला फार काही कमाल करता आलेली नाही. त्यामुळे शुबमनच्या खेळण्याने इशान बाहेर बसेल हे निश्चित आहे. रोहित शर्मा म्हणाला, ''माझ्यासाठी तयारी कशी झालीय हे महत्त्वाचे आहे. मी माझ्याकडून सर्व सामन्यांसाठी चांगलीच तयारी केलेली आहे. प्रत्येक दिवस हा नवीन असतो आणि नवीन आव्हानं घेऊन येतो. त्यामुळे तुम्ही मागे काय केलं हे महत्त्वाचं नसतं. तुम्ही आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार असायला हवे.''
पाकिस्तानविषयी बोलताना रोहितने म्हटले, दोन्ही संघ ताजेतवाने होऊन मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे आमच्यापैकी कुणी एक फेव्हरिट आहे, असे मला वाटत नाही. आव्हानांचा सामना करणे आणि सातत्य राखणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी अद्याप खेळपट्टी पाहिलेली नाही आणि गरज पडल्यास आम्ही तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरू.