India vs Pakistan, ICC Women's World Cup : भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची अपराजीत मालिका कायम राखली. महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी सांघिक कामगिरी करताना पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची अवस्था ६ बाद ११४ अशी दयनीय केली होती, परंतु पूजा वस्त्राकर व स्नेह राणा यांनी विश्वविक्रमी भागादारी करून पाकिस्तानसमोर तगडं आव्हान उभं केलं. त्यानंतर गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, स्नेह व दीप्ती यांनी कमाल दाखवताना पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. वन डे क्रिकेटमध्ये भारताचा हा पाकिस्तानवरील सलग ११ वा विजय आहे.
तिसऱ्या षटकात पहिला धक्का बसल्यानंतर स्मृती मानधना ( Smriti Mandhana) व दीप्ती शर्मा यांच्या ९२ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला कमबॅक करून दिले होते. प्ती ४० धावांवर माघारी परतली. त्यानंतर स्मृती ७५ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ५२ धावांवर बाद झाली. १ बाद ९६ अशा मजबूत स्थितीत असणाऱ्या भारताची अवस्था ६ बाद ११४ अशी झाली. हरमनप्रीत कौर ( ५), कर्णधार मिताली ( ९) व रिचा घोष ( १) यांचे अपयश भारताला महागात पडताना दिसत होते. पण, पूजा वस्त्राकर आणि स्हेन राणा यांनी सामनाच फिरवला. या दोघींनी ७व्या विकेटसाठी ९७ चेंडूंत १२२ धावांची भागीदारी केली. महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील ही ७व्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. पूजा ५९ चेंडूंत ८ चौकारांसह ६७ धावांवर बाद झाली. भारताने ७ बाद २४४ धावा उभ्या केल्या. स्नेह ४८ चेंडूंत ५३ धावांवर नाबाद राहिली.