Join us  

Moment of the day:  भारतीय संघाने सामना जिंकला अन् पाकिस्तानींचे मनही; India vs Pakistan सामन्यातील सर्वात सुंदर क्षण, Video 

India vs Pakistan,  ICC Women's World Cup : महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिलांनी दणक्यात सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 3:22 PM

Open in App

India vs Pakistan,  ICC Women's World Cup : महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिलांनी दणक्यात सुरुवात केली. मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचा हा पाकिस्तानवरील सलग चौथा विजय ठरला. भारताविरुद्ध आतापर्यंत झालेल्या ११ वन डे सामन्यांत पाकिस्तानला एकही विजय मिळवता आलेला नाही. भारतीय संघाच्या ७ बाद २४४ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १३७ धावांवर तंबूत परतला. या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानींचे मनही जिंकले.

हा सामना सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानची कर्णधार मरूफ बिस्माह ही तिच्या लहान बाळासह मैदानावर दाखल झाल्याचा फोटो व्हायरल झाला होता. मुलीला सहकारी खेळाडूंकडे सोपवून मरूफ मैदानावर उतरली होती. सामन्यानंतर भारतीय खेळाडू एकता बिस्त ही पाकिस्तानी ड्रेसिंग रुमच्या समोर उभ्या असलेल्या त्या नन्ही परीसोबत खेळताना दिसली आणि सोशल मीडियावर तो व्हिडीओ व्हायरल झाला. मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी मैदानाबाहेर एका कुटुंबाप्रमाणेच वावरतात हे या व्हिडीओतून समोर आले. एकताच्या या कृतीचे सर्वच कौतुक करत आहेत. 

दरम्यान, भारताची अवस्था ६ बाद ११४ अशी दयनीय झाली होती, परंतु पूजा वस्त्राकर व स्नेह राणा यांनी विश्वविक्रमी भागादारी करून पाकिस्तानसमोर तगडं आव्हान उभं केलं. स्मृती मानधना ( Smriti Mandhana) व दीप्ती शर्मा यांच्या ९२ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला कमबॅक करून दिले होते. दीप्ती ४० धावांवर, तर स्मृती ७५ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ५२ धावांवर बाद झाली. हरमनप्रीत कौर ( ५), कर्णधार मिताली ( ९) व रिचा घोष ( १) यांचे अपयश भारताला महागात पडताना दिसत होते. पण, पूजा वस्त्राकर आणि स्हेन राणा यांनी ७व्या विकेटसाठी ९७ चेंडूंत १२२ धावांची भागीदारी  केली. महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील ही ७व्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली.  पूजा ५९ चेंडूंत ८ चौकारांसह ६७ धावांवर बाद झाली.  भारताने ७ बाद २४४ धावा उभ्या केल्या. स्नेह ४८ चेंडूंत ५३ धावांवर नाबाद राहिली. 

प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सिद्रा अमीन व जवेरीया खान यांनी सावध सुरुवात केली. या दोघांनी ११ षटकांत केवळ २८ धावा केल्या. राजेश्वरी गायकवाडने पाकिस्तानला पहिला धक्का देताना खानला ( ११) बाद केले.  दीप्ती शर्मा व स्नेह राणा यांनी अनुक्रमे कर्णधार बिश्माह मरूफ ( १५) व ओमाइमा सोहैल ( ५) यांची विकेट घेतली. अमीन एका बाजूने संघर्ष करत होती. पण, भारताची अनुभवी गोलंदाज ३४ वर्षीय झुलन गोस्वामीने तिला बाद केले. झुलनने अमीन ( ३०) व निदा दार ( ४) यांना माघारी पाठवून पाकिस्तानची अवस्था ५ बाद ७० अशी केली.

त्यानंतर राजेश्वरी गायकवाडने सहावी विकेट घेताना आलिया रियाझला ( ११) यष्टिचीत केले. गायकवाडने सातत्यपूर्ण कामगिरी केली. गायकवाडने ३१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. झुलनने २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचा संपूर्ण संघ १३७ धावांवर तंबूत पाठवून भारताने १०७ धावांनी विजय मिळवला.  

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App