India vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारताकडून मानहानिकारक पराभव पत्करल्यानंतरही पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पडत आहे. भारताच्या 336 धावांचा पाठलाग करताना 6 बाद 212 धावाच करता आल्या आणि टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमानुसार 89 धावांनी विजय पक्का केला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ पाच सामन्यांत तीन पराभवासह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. तरीही उर्वरित चार सामन्यांत विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचा निर्धार पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने बोलून दाखवला.
पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्याच सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पण, त्यानंतर यजमान इंग्लंडला पराभूत करत पाकिस्तान संघाने धक्कादायक निकाल नोंदवला. मुसळधार पावसामुळे पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना समसामान एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी त्यांना पराभूत केले. 1992च्या वर्ल्ड कप स्पर्धेतही पाकिस्तानची वाटचाल अशीच सुरू होती आणि तेव्हा त्यांनी इम्रान खानच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप उंचावला होता. सर्फराजलाही त्याच चमत्काराची अपेक्षा असावी.
रविवारी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या. रोहित शर्मानं 140 धावांची खेळी केली. त्याला विराट कोहली ( 77) आणि लोकेश राहुल ( 57) यांची उत्तम साथ लाभली. प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून फखर जमान ( 62), बाबर आझम ( 48) आणि इमाद वासीम ( 46*) यांची संघर्ष केला. विजय शंकर, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
पाकिस्तान संघाला पुढील सामन्यांत दक्षिण आफ्रिका ( 23 जून), न्यूझीलंड ( 26 जून), अफगाणिस्तान ( 29 जून) आणि बांगलादेश ( 5 जुलै) यांचा सामना करावा लागणार आहे. गुणतालिकेनुसार ऑस्ट्रेलिया 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ न्यूझीलंड ( 7), भारत ( 7) आणि इंग्लंड ( 6) हे अव्वल चौघांत आहेत.
Web Title: India vs Pakistan, ICC World Cup 2019 : Point Table after India vs Pakistan match, know which team on top
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.