India Vs Pakistan, ICC World Cup 2019 : टीम इंडियाने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला पुन्हा नमवून भारतीयांचा रविवार स्पेशल केला. भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध विजयाची परंपरा कायम राखली. रोहित शर्माचे खणखणीत शतक आणि त्याला लोकेश राहुल व विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीची मिळालेली साथ, याच्या जोरावर भारताने 336 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर कुलदीप यादवनं पाकिस्तानच्या डावाला कलाटणी देत भारताचा विजय पक्का केला. भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आघारे 89 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात रोहितनं 140 धावांची खेळी करत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. रोहितनं या खेळीत एक फटका असा मारला की जो पाहून सर्वांना महान फलंदाज सचिन तेंडुलकर आठवला.
भारताने 5 बाद 336 धावा उभारल्यानंतर पाकिस्तानचा डाव 40 षटकांत 6 बाद 212 धावांत रोखला गेला. पावसाच्या व्यत्ययानंतर पाकला अखेरच्या 5 षटकांत 136 धावांचे ‘सुधारित’ आव्हान मिळाले होते. मात्र त्यांना केवळ 46 धावाच करता आल्या. सर्वात महत्त्वाचे या धमाकेदार विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकविरुद्ध झालेल्या पराभवाची व्याजासहीत परतफेडही केली. पावसामुळे अनेकदा खेळ थांबवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे आव्हान मिळाले आणि तेव्हा पाकिस्तानने 35 षटकांत 6 बाद 166 धावा केल्या होत्या. हे आव्हान अवाक्याबाहेरचे ठरल्याने नंतर पाकने विजयाचे सर्व प्रयत्नही सोडले आणि केवळ सामना पूर्ण होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली होती.
रोहितने 113 चेंडूंत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने चोपल्या 140 धावा चोपल्या. त्यानं लोकेश राहुलसह सलामीला 136 धावांची विक्रमी भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. रोहितनं या खेळीदरम्यान 2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील तेंडुलकरनं पाकच्या शोएब अख्तरला मारलेल्या अपरकटची आठवण करून देणारा फटका मारला. हसन अलीच्या शॉर्ट पीच चेंडूवर रोहितनं अपरकट मारत खणखणीत षटकार ठोकला. 16 वर्षांपूर्वी तेंडुलकरनेही असाच अपरकट अख्तरच्या गोलंदाजीवर मारला होता.