India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघाला पुन्हा लोळवले. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्ध पाकची विजयाची पाटी कोरीच राहिली. भारताचा हा पाकिस्तानवरील सातवा विजय ठरला. भारताच्या 336 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. पावसामुळे अनेकदा खेळ थांबवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे आव्हान मिळाले आणि तेव्हा पाकिस्तानने 35 षटकांत 6 बाद 166 धावा केल्या होत्या. हे आव्हान अवाक्याबाहेरचे ठरल्याने नंतर पाकने विजयाचे सर्व प्रयत्नही सोडले आणि केवळ सामना पूर्ण होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली होती. त्यामुळे सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीनं भारतीय संघाचे अभिनंदन केले.
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान तिसऱ्यांदा पाऊस पडला तेव्हा खेळाडूंनी मैदान सोडलं. त्यानंतर काही वेळातच आफ्रिदीनं भारतीय संघ आणि बीसीसीआयचे अभिनंदन केले. त्यानं लिहिले की,''40-50 धावा करणाऱ्या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली पाहिजे. धावांचा पाठलाग करताना शांत व एकाग्र असण्याची गरज आहे. क्षेत्ररक्षणही महत्त्वाची बाजू आहे. 70-80 टक्के सामने क्षेत्ररक्षकच जिंकून देतात.''
रोहित शर्माचे खणखणीत शतक आणि त्याला लोकेश राहुल व विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीची मिळालेली साथ, याच्या जोरावर भारताने 336 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर कुलदीप यादवनं पाकिस्तानच्या डावाला कलाटणी देत भारताचा विजय पक्का केला. भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आघारे 89 धावांनी विजय मिळवला. रोहितने 113 चेंडूंत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने चोपल्या 140 धावा चोपल्या. त्यानं लोकेश राहुलसह सलामीला 136 धावांची विक्रमी भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. प्रत्युत्तरात विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत पाकिस्तानला जबर धक्का दिला. पाकिस्तानकडून फखर जमान ( 62), बाबर आजम ( 48) आणि इमाद वसीम ( 46*) यांची संघर्ष केला.