India vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघावर दणदणीत विजय मिळवला. रविवारी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या. या पराभवानंतर माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनं पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदवर टीका केली. अख्तरनं सर्फराजला चक्क बिनडोक म्हटलं.
नाणेफेकीचा कौल बाजूनं लागूनही सर्फराजनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मतही अख्तरने व्यक्त केले. तो म्हणाला,''खेळपट्टी पूर्णपणे कोरडी होती. ती संपूर्ण वेळ झाकून ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यावर दव जमण्याची कोणतीच शक्यता नव्हती. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय बिनडोकच घेऊ शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं अशी चूक केली होती आणि आज पाकिस्ताननं त्याची पुनरावृत्ती केली.''
तो पुढे म्हणाला,''पाकिस्तानला धावांचा पाठलाग करता आलेला नाही आणि हा भारताविरुद्धचा हा इतिहास आहे. 1999 ला पाकिस्तानला चांगल्या सुरुवातीनंतरही 227 धावा चेस करता आल्या नव्हत्या. असे असताना सर्फराजनं हा निर्णय का घेतला, हे काही कळेना.''
पाहा व्हिडीओ..
हरलं पाकिस्तान, ट्रोल झाली सानिया मिर्झा; दिलं सडेतोड उत्तर!
पाकिस्तानच्या पराभवाचं खापर पाकिस्तानच्या चाहत्यांनी भारताची टेनिसपटू सानिया मिर्झावर फोडले. पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिकची पत्नी असलेल्या सानियानेही नेटिझन्सला त्यांच्या भाषेत सडेतोड उत्तर दिले. भारतविरुद्धच्या लढतीच्या एकदिवस आधी सानिया पती शोएबसह एका कॅफेमध्ये डिनरसाठी गेली होती. यावेळी पाकिस्तानचे काही खेळाडूही होते. त्यावरून नेटिझन्सने पाक खेळाडूंसह सानियावरही टीका केली.
त्यावरून सानियानेही प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली,''एखाद्या व्यक्तिचा खासगी व्हिडीओ असा जाहीर करणं चुकीचं आहे. हो आम्ही डिनरसाठी गेलो होतो आणि मॅच पराभूत झाल्यावरही खेळाडूंना जेवण्याचा हक्क असतो. मुर्खांचा बाजार मांडला आहे. पुढच्यावेळी टीका करण्यासाठी काही तरी नवीन गोष्ट शोधून आणा.''
Web Title: India vs Pakistan, ICC World Cup 2019 : Shoaib Akhtar slams ‘brainless’ captain Sarfaraz Ahmed as India thump Pakistan in World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.