मुंबई, आशिया चषक 2018 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना तासाभरात सुरू होईल. आशिया चषक स्पर्धेच्या या लढतीत दोन्ही संघ विजयासाठी आतुर आहेत. या सामन्यातील विजय हा कोणत्याही संघाला पुढील वाटचालीसाठी प्रचंड आत्मविश्वास देणारा ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ लढतीत सर्वोत्तम खेळाडूंची फळी घेऊन मैदानावर उतरणार आहेत. पाकिस्तानचा संघ समतोल आहे, पण भारतीय संघाला अद्याप योग्य घडी बसवता आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा कोणत्या अकरा शिलेदारांना घेऊन मैदानात उतरेल याची उत्सुकता आहे.हाँगकाँगविरुद्धच्या लढतीकडे भारतीय संघाने सराव सामना म्हणून पाहिले आणि त्यामुळेच संघात प्रयोग केले. हे प्रयोग काही अंशी फसले असले तरी पाकिस्तानविरुद्ध कोणत्या चुका महागात पडू शकतील याची जाण त्या सामन्याने करून दिली. हाँगकाँगविरुद्ध शिखर धवन आणि अंबाती रायुडू वगळता अन्य फलंदाजांना साजेसा खेळ करता आला नाही. जलदगती गोलंदाज अपयशी ठरले, तर फिरकी गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन रोहित अंतिम अकरा खेळाडूंची निवड करेल. पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघांनी हाँगकाँगच्या खेळाडूंना मार्गदर्शन केले. पहिल्या सामन्यात लोकेश राहुल, हार्दिक पांड्या व जस्प्रीत बुमरा या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यांना पाकिस्तानविरुद्ध संधी मिळण्याची शक्यता आहे. या तिघांना स्थान मिळाल्यास दिनेश कार्तिक, केदार जाधव आणि शार्दूल ठाकूर यांना डच्चू मिळू शकतो. रोहित आणि शिखर धवन सलामीची जबाबदारी स्वीकारतील, तर मधल्या फळीत राहुल, अंबाती रायुडू, महेंद्रसिंह धोनी यांच्यावर मदार असेल.गोलंदाजीत पेचतीन जलदगती आणि दोन फिरकी असे एकूण पाच गोलंदाज खेळवल्यास भारताकडे बुमरा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद हे जलद मारा करणारे, तर कुलदीप यादव व युजवेंद्र चहल हे फिरकीचे पर्याय आहेत. पण, पाकिस्तानविरुद्ध नवख्या खलीलला स्थान देण्याएवजी रोहित अष्टपैलू पांड्याला संधी देऊ शकतो. असे झाल्यास केदार जाधव किंवा दिनेश कार्तिक यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
असे असतील अंतिम अकरारोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, केदार जाधव/दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमरा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव.