Join us

IND vs PAK हा मोठा सामना, पण त्याही पेक्षा मोठी मॅच...; शुबमन गिल असं का बोलला?

Shubman Gill, IND vs PAK Champions Trophy 2025: रविवारी, २३ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 23:27 IST

Open in App

Shubman Gill, IND vs PAK Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद भुषवणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला धक्क्यावर धक्के बसल्याचे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पहिल्या लढतीत न्यूझीलंडच्या संघाने त्यांना पराभूत केले. त्यानंतर पाकिस्तानचा बडा फलंदाज फखर झमान याला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. अशा परिस्थितीत रविवारी रंगणाऱ्या भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय संघ फेव्हरिट मानला जातोय. संपूर्ण जगासाठी भारत विरूद्ध पाकिस्तान हा एक मोठा सामना आहे. पण टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिलने मात्र वेगळेच मत मांडले आहे.

शुभमन गिलने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी टीम इंडियाचा प्रतिनिधी म्हणून त्याने काही प्रश्नांना उत्तरे दिली. "सध्या आम्ही खूपच चांगल्या लयीत आहोत. आमचे फलंदाज चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. पण असे असले तरी आम्ही पाकिस्तानच्या संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना मोठा आहे यात वाद नाही. पण त्यापेक्षाही मोठा सामना म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आहे," असे गिल अतिशय स्पष्टपणे म्हणाला.

"मी जेव्हा फील्डिंगसाठी मैदानावर असतो, तेव्हा माझं काम हेच असतं की गोलंदाज म्हणून आमचे खेळाडू योग्य विचार करत आहेत की नाही याबाबत त्यांना सांगत राहणे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून गोलंदाजी करणे खूपच अवघड आणि कष्टाचे असते. अशावेळी रोहित शर्माने मला जबाबदारी दिली आहे की जेव्हा मी कव्हर क्षेत्रात फिल्डिंग करत असेल तेव्हा मी सतत गोलंदाजांची चर्चा करत राहावी आणि आमच्या खेळाच्या प्लॅनिंगबद्दल सतत त्यांना सांगत राहावे," असेही शुबमन गिलने सांगितले.

"भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला खूप जास्त हाइप करण्यात आले आहे की नाही याबाबत मला कल्पना नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नक्कीच हायव्होल्टेज असतो. लाखो लोक हा सामना पाहण्यास पसंती दाखवतात. अशा वेळी जो संघ दबावाच्या क्षणी सर्वोत्तम कामगिरी करू शकतो, त्याच संघाला जिंकण्याची अधिक संधी असते. कसोटी क्रिकेटच्या तुलनेत ५० षटकांचे सामने हे कमी लांबीचे असतात त्यामुळे हे सामने कमी वेळात योग्य निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करतात. अशावेळी जो संघ चांगला खेळेल, त्याचाच अंतिम विजय असतो," याकडेही गिलने लक्ष वेधले.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारत विरुद्ध पाकिस्तानशुभमन गिलपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ