India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच बँड वाजवला. या दोघांच्या दमदार खेळींमुळेच भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 336 धावा करता आल्या.
पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. कारण भारताच्या सलामीवीरांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढली. रोहित शर्माने तर १४० धावा फटकावत पाकिस्तानच्या गोलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडले. सलामीवीर लोकेश राहुलनेही यावेळी ५७ धावांची खेळी साकारली.
रोहितने या सामन्यात ११३ चेंडूंमध्ये १४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १४० धावांची खेळी साकारली. या १४० धावांच्या खेळीनंतर रोहितने आपल्या नावावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम आता रोहितच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम कोहलीच्या नावावर होता. कोहलीने यावेळी ६५ चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर ७७ धावा केल्या.
23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम
पावसाच्या सावटामुळे भारत-पाकिस्तान सामन्यावर असलेले अनिश्चिततेचं सावट अखेर दूर झालं. नाणेफेकीचा कौल भारताच्या विरोधात गेला असता तरी रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पाकिस्तानच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा टीम इंडियाला फायदा झाला. शिखर धवनच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या राहुलनं पहिल्या विकेटसाठी रोहितला तोडीसतोड साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून 23 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
सामन्याच्या दहाव्या षटकार रोहितला बाद करण्याची आयती संधी पाकिस्ताननं गमावली. दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात असताना लोकेश राहुलनं खेळपट्टीच्या मधोमध आलेल्या रोहितला माघारी पाठवले. त्याचवेळी पाकिस्तानच्या खेळाडूनं नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केला. हाच थ्रो यष्टिरक्षकाकडे केला असता तर रोहित बाद झाला असता. त्यानंतर या दोघांनी फटकेबाजी करताना अर्धशतकी भागीदारी केली.
रोहितनं यावेळी वन डे कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं. त्यानं 34 चेंडूंत 50 धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये सलग पाच अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्यानं स्थान पटकावलं. अशी कामगिरी यापूर्वी सचिन तेंडुलकर ( 1994), विराट कोहली (2012), अजिंक्य रहाणे ( 2017-18) यांनी अशी कामगिरी केली आहे. रोहितनं लोकेश राहुलसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना सचिन तेंडुलकर व नवज्योत सिद्धू यांचा विक्रम मोडला. या दोघांनी 1996 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 90 धावांची भागीदारी केली होती. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय सलामीवीरांची ही सर्वोत्तम कामगिरी होती. आज तो विक्रम रोहित व राहुल यांनी तोडला.