India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : आज सुरु असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सर्वांनी मनं जिंकली ती सलामीवीर रोहित शर्माने. आपल्या नजाकतभऱ्या फटक्यांनी चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले, पण त्याचबरोबर रोहितने या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
रोहितच्या चौकाराच्या जोरावर भारताने आपल्या धावांचे खाते उघडले. त्यानंतर रोहितने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर प्रहार करायला सुरुवात केली. रोहितने दमदार फटक्यानिशी आपले शतक साजरे केले. पाकिस्तानविरुद्ध रोहितचे हे दुसरे शतक ठरले. त्याचबरोबर विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताच्या फलंदाजाने फटकावलेले हे दुसरे शतक ठरले. यापूर्वी विराट कोहलीने २०१५ साली झालेल्या विश्वचषकात भारताकडून पाकिस्तानविरुद्ध पहिले शतक झळकावले होते.
रोहितने या सामन्यात ११३ चेंडूंमध्ये १४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १४० धावांची खेळी साकारली. या १४० धावांच्या खेळीनंतर रोहितने आपल्या नावावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम आता रोहितच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम कोहलीच्या नावावर होता.
विराट कोहलीच्या चुकीमुळेच रोहित शर्मा आऊटरोहित शर्मा पाकिस्तानविरुद्दच्या सामन्यात द्विशतक झळकावणार, असे साऱ्यांना वाटले होते. पण चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला आणि त्याचे दीडशतकही हुकले. पण रोहितला हा फटका मारण्याचा सल्ला भारताचा कर्णधार विराट कोहलीनेच दिल्याचे पाहायला मिळाले.
हसन अलीच्या ३९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहितने दमदार चौकार वसूल केला. या चौकारानंतर रोहित १४० धावांवर येऊन ठेपला होता. आता रोहित द्विशतक झळकावणार, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण रोहितने विराटचा सल्ला ऐकला आणि १४० धावांवर बाद होऊन तो तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या चेंडूवर रोहितने चौकार वसूल केला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूला रोहित सामोरे जाण्यासाठी सज्ज होता. त्यावेळी कोहलीने रोहितला 'फाइन लेग'चा खेळाडू जवळ आला आहे, असे सांगितले. त्यानुसार रोहित दुसरा चेंडू 'फाइन लेग'ला मारायला गेला आणि आपला झेल वहाब रियाझच्या हाती देऊन माघारी परतला. ही गोष्ट समालोचक संजय मांजरेकर यांनी निदर्शनास आणून दिली.