मँचेस्टर - विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या महामुकाबल्यामध्ये भारतीय फलांदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई केली. दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही शानदार खेळी करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजून एका विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटने केवळ 222 डावांत 11 हजार धावा पूर्ण केल्या. त्याबरोबरच तो सर्वात वेगाने 11 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे.
विराट हा सर्वात कमी म्हणजे 222 डावांत 11 हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने 276 डावांत 11 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्याबरोबरच 11 वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.