दुबई: भारताने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानवर आठ विकेट्स राखत सहज विजय मिळवला. गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे पाकिस्तानला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 162 धावा करता आल्या. भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांनी यावेळी प्रत्येकी तीन बळी मिळवले. पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करत रोहित शर्माने अर्धशतक झळकावत विजयात मोलाची भूमिका बजावली. रोहितने 39 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 52 धावा केल्या. शिखर धवनने 46 धावा करत रोहितला चांगली साथ दिली. हे दोघे बाद झाल्यावर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक यांनी प्रत्येकी नाबाद 31 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
सामनावीर ठरला भुवनेश्वर कुमार
शिखर धवन बाद; भारताला दुसरा धक्का
अर्धशतकानंतर रोहित शर्मा बाद
भारताचा कर्णधार रोहित शर्माचे चौकारासह अर्धशतक
भारत दहा षटकांत बिनबाद 58
हिटमॅन रोहित शर्माची फटकेबाजीला सुरुवात; आठव्या षटकात लगावले दोन षटकार
भारताची सावध सुरुवात; पाच षटकांत बिनबाद 15
भारताच्या गोलंदाजांनी करून दाखवलं; पाकिस्तानला 162 धावांत तंबूत धाडलं
पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करून दाखवली आणि पाकिस्तानला 162 धावांत तंबूत धाडण्याचा पराक्रम केला. भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर फिरकीपटू केदार जाधवने तीन बळी मिळवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. केदार आणि भुवनेश्वर यांनी मिळून पाकिस्तानचा सहा फलंदाजांना बाद केले. जसप्रीत बुमरानेही यावेळी दोन बळी मिळवले. पाकिस्तानकडून बाबर आझमने 47 आणि शोएब मलिकने 43 धावा केल्या.
भारताकडून पाकिस्तानचा 162 धावांत धुव्वा
पाकिस्तानला नववा धक्का; हसन अली बाद
पाकिस्तानला आठवा धक्का; फहिम अश्रफ बाद
पाकिस्तान 40 षटकांत 7 बाद 157
पाकिस्तानला सातवा धक्का; केदार जाधवने मिळवला तिसरा बळी
पाकिस्तानला सहावा धक्का; असिफ अली बाद
पाकिस्तानला मोठा धक्का; शोएब मलिक 43 धावांवर बाद
आतापर्यंत दोनदा जीवदान मिळालेल्या पाकिस्तानच्या शोएब मलिकला जास्त जास्त धावा करता आल्या नाही. मलिकने 43 धावांवर धावचीत होत आत्मघात केला. मलिकला यापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि भुवनेश्वर कुमार यांनी झेल सोडत जीवदान दिले होते.
पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ बाद; मनीष पांडेचा अप्रतिम झेल
पाकिस्तानला तिसरा धक्का; बाबर आझम आऊट
भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने पाकिस्तानच्या बाबर आझमला त्रिफळाचीत करत पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. बाबरने सहा चौकारांच्या जोरावर 47 धावा केल्या.
हार्दिक पंड्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेले
अठराव्या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना पंड्याला पाठीमध्ये उसण भरली. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.
शोएब मलिकला धोनीने दिले २६ धावांवर जीवदान
हार्दिक पंड्याच्या सोळाव्या षटकात पाकिस्तानच्या शोएब मलिकला जीवदान मिळाले. मलिकचा झेल यावेळी भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने सोडला. मलिक त्यावेळी २६ धावांवर होता.
वैयक्तिक पहिल्या षटकानंतर युजवेंद्र चहल पॅव्हेलियनमध्ये दाखल झाला आहे. चहलला पहिल्य षटकाच चांगली लय सापडली नव्हती. त्याच्या पहिल्या षटकात पाकिस्तानच्या फलंदाजांनी एका चौकारासह सात धावा फटकावल्या होत्या. पॅव्हेलियनमध्ये भारतीय संघातील सपोर्ट स्टाफ चहलला मार्गदर्शन करत होते.
पाकिस्तान बारा षटकांत 2 बाद 39
पाकिस्तान सावरले; दहा षटकांत 2 बाद 12 असा स्कोर
सामन्याच्या सुरुवातीला बसलेल्या दोन धक्क्यांनंतर पाकिस्तानचा संघ सावरला. दहा षटकांच्या पहिल्या पॉवर-प्लेमध्ये त्यांनी दोन फलंदाज गमावत 25 धावा केल्या.
पाकिस्तान सहा षटकांत 2 बाद 12
भारताच्या भुवनेश्वर कुमारने पाकिस्ता़नच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यामुळे पाकिस्तानच्या धावा आटल्या. पहिल्या सहा षटकात भुवनेश्वर आणि जसप्रीत बुमरा यांनी भेदक मारा केला. त्यामुळे पहिल्या सहा षटकांत पाकिस्तानची 2 बाद 12 अशी अवस्था होती.
पाकिस्तानला दुसरा धक्का, सलामीवीर फखर झमान बाद
भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानच्या दुसऱ्या फलंदाजाला बाद केले. युजवेंद्र चहलने झमानचा झेल पकडला.
पाकिस्तानला पहिला धक्का, सलामीवीर इमाम उल हक बाद.
भुवनेश्वर कुमारने इमामला दोन धावांवर असताना यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीकरवी झेलबाद केले.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बुमराच्या पहिल्या षटकात एकही धाव नाही. आपल्या पहिल्या षटकात बुमराने पाकिस्तानचा सलामीवीर फखर झामनला सहा चेंडू खेळवले.
पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघामध्ये युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांचे पुनरागमन झाले आहे.
दोन्ही संघ
भारत
पाकिस्तान
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना आता काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे. पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकली असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.