India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीचा सामना करण्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना अपयश आलं. पण, इशान किशन आणि हार्दिक पांड्या या जोडीनं पाकिस्तानला घाम फोडला. पाचव्या बळीसाठी दोघांनी मोठी भागीदारी नोंदवत भारतीय चाहत्यांना जागं केलं. शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ या जोडीनं भारतीय फलंदाजीची कंबर मोडली. पण, इशान किशननं अप्रतिम खेळी करत ८१ चेंडूत ८२ धावा कुटल्या.
३८व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हारिस रौफनं इशान किशनला बाद केले अन् बाहेरचा रस्ता दाखवला. २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीनं किशननं ८२ धावांची शानदार खेळी केली. सेट फलंदाजाला बाद केल्यानंतर हारिस रौफचा आनंद गगनात मावत नव्हता. किशनला बाद करताच हारिसनं खुन्नस दाखवत हातवारे करत इशानला बाहेर जाण्याचा इशारा केला. पाकिस्तानी खेळाडूची ही खुन्नस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
४१ षटकांपर्यंत भारतीय संघाने ५ बाद २२१ धावा केल्या असून हार्दिक पांड्या (८०) आणि रवींद्र जडेजा (१२) खेळपट्टीवर टिकून आहे. पाकिस्तानकडून हारिस रौफनं सर्वाधिक (३) बळी घेतले तर शाहीन आफ्रिदीला (२) बळी घेण्यात यश आलं. नेहमीप्रमाणे पाकिस्तानी गोलंदाजांनी आपली अप्रतिम कामगिरी करत भारतीय संघाला कोंडीत पकडले. पहिल्यांदा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा त्रिफळा उडवून शाहीन आफ्रिदीने टीम इंडियाला मोठे धक्के दिले. त्यानंतर हारिस रौफने श्रेयस अय्यरची शिकार केली. पण, सलामीवीर शुबमन गिल मात्र सावध खेळी करून खेळपट्टीवर टिकून होता. पण, गिलचा देखील त्रिफळा उडवून हारिस रौफने भारतीय चाहत्यांना शांत केले. गिल पंधराव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बाद झाला. हारिस रौफच्या वेगवान चेंडूने त्याचा त्रिफळा काढला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली अघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ.
Web Title: India vs Pakistan Live Scorecard Haris Rauf shows aggression after dismissing Ishan Kishan, video goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.