Join us  

१०, ११ अन् १२ सप्टेंबर ! टीम इंडिया सलग तीन दिवस खेळणार, उद्याची मॅच किती वाजता सुरू होणार?

India vs Pakistan Live Update Marathi : भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सुपर ४ मधील सामना आजच्या दिवसापुरता स्थगित करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 9:06 PM

Open in App

India vs Pakistan Live Update Marathi : भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सुपर ४ मधील सामना आजच्या दिवसापुरता स्थगित करावा लागला. रविवारी कोलंबो येथे पाऊस दमदार हजेरी लावेल असे संकेत दिले होते, परंतु दुपारी लख्ख प्रकाश होता अन् चाहते आनंदीत झाले होते. बाबार आजमने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीला बोलावले अन् रोहित शर्मा व शुबमन गिलने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. पण, त्यांच्या विकेट्स गेल्या अन् वरूण राजा रुसला... सातत्याने व्यत्यय आणत त्याने अखेर सामना राखीव दिवसावर ढकलला. मात्र, टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. आता भारताला १०, ११ व १२ सप्टेंबर असे सलग तीन दिवस खेळावे लागणार आहे. 

फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर बाबर आजमने नाणेफेक जिंकून भारताला आयते कोलीत दिले. रोहित आणि शुबमन यांनी  पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची विक्रमी भागीदारी केली. रोहित ५६ धावांवर, तर  शुबमनही ५८ धावांवर बाद झाला. दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा डाव थोडासा मंदावला. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी संयमी खेळावर भर दिला. २४.१ षटकानंतर पावसाला सुरुवात झाली आणि मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले. साडेपाच वाजता पाऊस थांबल्याने ५.५७ ला कव्हर्स काढण्याचं काम सुरू झालं, परंतु ६.०२ वाजता पुन्हा पाऊस सुरू झाला.  

८.३० वाजता खेळपट्टीची पाहणी झाली अन् ९ वाजता मॅच सुरू होण्याचा निर्णय झाला. ३४-३४ षटकांची सामना खेळवण्याचं ठरलं. अम्पायर्स शेवटची पाहणी करण्यासाठी मैदानावर आले अन् पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे मैदान पुन्हा झाकावे लागले अन् आजच्या दिवसाचा खेळ स्थगित करावा लागला. टीम इंडिया उद्या ३ वाजता मैदानावर उतरेल अन् २४.१ षटकापासून पुन्हा पुढे खेळतील. त्यानंतर पाकिस्तान ५० षटकं खेळेल. पण, भारताला पुन्हा १२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक होणार आहे. 

 

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानभारत विरुद्ध श्रीलंका
Open in App