India vs Pakistan Live Update Marathi : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या दमदार फटकेबाजीमुळे हतबल झालेल्या पाकिस्तानच्या मदतीला पाऊस धावून आला. रोहित व शुबमन यांनी १२१ धावांची भागीदारी केली अन् पाकिस्तानला ओपनर्सला माघारी पाठवण्यात यश आले. सामन्यावर पकड घेण्यासाठी उत्सुक असलेल्या पाकिस्तानसाठी पावसाने बॅटींग सुरू केली. २४.१ षटकांत २ बाद १४७ धावांवर भारताचा खेळ पावसामुळे थांबला. दीड तासांनी पावसाने विश्रांती घेतली, परंतु मैदान पूर्णपणे चिंब झाले होते अन् ग्राऊंड्समन्सना मोठमोठ्या स्पंजने मैदान सुकवावे लागत होते. ग्राऊंड्समन त्यांच्याकडून पूर्णपणे मेहनत घेताना दिसत आहेत.
भारताची बॅटींग न आल्यास, DLS नुसार कसे असेल लक्ष्य? पाकिस्तानचा फायनलचा मोकळा होतोय मार्ग
बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तिथेच तो फसला. रोहित आणि शुबमन या जोडीने चौकार-षटकारांची आतषबाजी करातना पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची विक्रमी भागीदारी केली. शादाबच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित ५६ धावांवर ( ४९ चेंडू, ६ चौकार व ४ षटकार) झेलबाद झाला. पाठोपाठ शुबमनही ५२ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावांवर बाद झाला. दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा डाव थोडासा मंदावला. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी संयमी खेळावर भर दिला.
२४.१ षटकानंतर पावसाला सुरुवात झाली आणि मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले. भारताच्या २ बाद १४७ धावा झाल्या आहेत. साडेपाच वाजता पाऊस थांबल्याने ५.५७ ला कव्हर्स काढण्याचं काम सुरू झालं, परंतु ६.०२ वाजता पुन्हा पाऊस सुरू झाला. ८ मिनिटांनी तो थांबला. ६.२२ वाजल्यानंतर षटकं कमी होत गेली आणि जर १०.३६ वाजेपर्यंत मॅच सुरू न झाल्यास पाकिस्तानला २० षटकांचा सामना करावा लागेल आणि त्यांच्यासमोर १८१ धावांचे लक्ष्य असू शकते. पण, तेही शक्य न झाल्यास सामना राखीव दिवशी जाईल आणि इथे भारताची डोकेदुखी वाढेल. कारण १२ तारखेला त्यांना श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे.