भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जेव्हा समोर आले, तेव्हा चाहत्यांना श्वास रोखून धरावा लागला. या दोन देशांमधील एवढी जबरदस्त आहे की, चाहतेच नव्हे तर खेळाडूंनाही फुल टशनमध्ये खेळताना पाहिले आहे. ७ जून २०२४ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ समोरासमोर येणार आहेतच, परंतु जुलै महिन्यातही आशिया खंडातील हे दोन बलाढ्य संघ एकमेकांना टक्कर देतील. पण, या सामन्यात सध्याचे खेळाडू नसतील, तर युवराज सिंग व शाहिद आफ्रिदी यांच्यासारखे दिग्गज खेळतील. तेही लीजंड्सची जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ( World Championship of Legends ).
३ जुलै २०२४ पासून एडबस्टन येथे WCL स्पर्धआ खेळवली जाईल आणि त्यात माजी खेळाडूंचा समावेश असलेले भारत, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया असे सहा देश खेळतील. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध मॅच खेळतील. भारत-पाकिस्तान या दोन कट्टर स्पर्धकांसोबतच इंग्लंड-ऑस्ट्रेलिया हे वैरीही भिडणार आहेत.
भारत -पाकिस्तान यांच्यातला सामना ६ जुलैला होईल. त्याशिवाय भारतीय संघ इंग्लंड ( १ जुलै), वेस्ट इंडिज ( ५ जुलै), ऑस्ट्रेलिया ( ८ जुलै) आणि दक्षिण आफ्रिका ( १० जुलै) यांच्याविरुद्ध खेळेल. १३ जुलैला फायनल खेळवली जाईल, तर १२ जुलैला उपांत्य फेरीचे सामने होतील. युवराज व आफ्रिदीशिवाय या लीगमध्ये युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल, केव्हीन पीटरसनही दिसतील.