India vs Pakistan : पाकिस्तान संघानं १० विकेट्स राखून टीम इंडियावर विजय मिळवला. ट्वेंटी-२०च नव्हे तर वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचा हा टीम इंडियावरील पहिलाच विजय ठरला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध विजयाचा षटकार खेचण्याचे भारताचे स्वप्न खंडित झाले आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर दोन्ही देशांचे खेळाडू एकमेकांशी चांगला संवाद साधताना दिसले. पण, पत्रकार परिषदेत एक वेगळाच सामना पाहायला मिळाला. पाकिस्तानी पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नावर विराट कोहलीनं ( Virat Kohli) शाळा घेतली.
प्रथम फलंदाजी करताना भारताकडून विराट ( ५७) व रिषभ पंत ( ३९) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. रोहित शर्मा ( Rohit Sharma) गोल्डन डकवर माघारी परतला, लोकेश राहुल ( ३) व सूर्यकुमार यादव ( ११) हेही अपयशी ठरले. तरीही भारतानं ७ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानच्या बाबर आजमनं ( Babar Azam) ५२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८, तर मोहम्मद रिझवाननं ५५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. पाकिस्ताननं १७.५ षटकांत बिनबाद १५२ धावा केल्या.
पत्रकार परिषदेत काय घडलं?
- पाकिस्तानी पत्रकारानं विचारले - सराव सामन्यात इशान किशन यानं चांगली कामगिरी केली. त्यामुळे जर आज इशान किशन खेळला असता तर त्यानं रोहित शर्मापेक्षा चांगली कामगिरी केली असती, असे तुला वाटत नाही का?
- विराट कोहली त्या पत्रकाराकडे आश्चर्यानं पाहत म्हणाला- हा खूप धाडसी प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते सर? मी सर्वोत्तम संघ घेऊनच मैदानावर उतरलो, तुमचं मत काय?, तुम्ही खरंच ट्वेंटी-२० सामन्यातून रोहित शर्माला ड्रॉप केलं असतं?, ज्यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. ( डोक्यावर हात मारून) सर तुम्हाला काँट्रोव्हर्सी हवी आहे, तर मला आधीच सांगा, मी त्यानुसार उत्तर देईन.
पाहा व्हिडीओ...