दुबई, आशिया चषक 2018 : भारताने बुधवारी पाकिस्तानवर विजय मिळवला. भारताचा हा सलग दुसरा सामना होता. याबद्दल भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भाष्य केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर त्याने संघासाठी एक संदेश लिहिला आहे.
उत्तम गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजांनी जबाबदारीने केलेला खेळ, याच्या जोरावर भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु त्यांना समाधानकारक लक्ष्य उभारता आले नाही. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ 162 धावांवर माघारी परतला. भारताने हे लक्ष्य अवघ्या 29 षटकांत पूर्ण करताना विजयी मालिका कायम राखली. भारताने आठ विकेट राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने पाकिस्तानवर नोंदवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला.
सचिनने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, " सलग दोन दिवस सामने खेळणे सोपे नसते. त्यामध्ये दुसरा सामना पाकिस्तानबरोबर असेल तर ती लढत खेळणे सोपी नसते. पण भारताने या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केली. "