India vs Pakistan - भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा ( Sania Mirza) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पती शोएब मलिक ( Shoaib Malik) याला चिअर करण्यासाठी दुबईत दाखल झाली आहे. ती पाकिस्तानच्या बायो-बबलमध्ये दाखल झाली असून पाकिस्तानचा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबलाय, तेथेच ती राहणार आहे. GEO न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार सानिया तिच्या मुलगा इझान यालाही सोबत घेऊन आली आहे. तिला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना रविवारी २४ ऑक्टोबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
आयसीसीनं खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहण्याची परवानगी दिली आहे, परंतु कुटुंबीयांनाही कोरोना चाचणी व बायो बबलच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. शोएब मलिकसह इमाद वासीम, फाखर जमान, मोहम्मद रिझवान, मुहम्मद हाफिज व हसन अली यांचे कुटुंबीयही सोबत आले आहेत. भारतीय क्रिकेटपटूंबद्दल सांगायचे तर विराट कोहली. रोहित शर्मा, आर अश्विन यांचेही कुटुंबीय दुबईत आहेत. दरम्यान, सानियानं भारत-पाकिस्तान लढती दरम्यान सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सानियाचा साखरपुडा मोडला अन् शोएबशी कसे झाले लग्न, तुम्हाला माहिती आहे का...
सानियाचे लग्न तिचा लहानपणीचा मित्र सोहराबबरोबर ठरले होते. २००९ साली सानिया आणि सोहराब यांचा साखरपूडा झाला होता. पण हा साखरपुडा मोडण्यात आला. त्याचवेळी सानियाचे करीअरमध्येही काही चांगले सुरु नव्हते. वाईट फॉर्मातून सानिया जात होती. दुसरीकडे शोएबलाही क्रिकेटमध्ये जास्त धावा करता येत नव्हता. सानिया आणि शोएब ऑस्ट्रेलियातील स्पर्धांच्यावेळी एकत्र आले. त्यावेळी दोघांमध्ये संवाद घडला. या संवादाचे पुढे मैत्रीमध्ये आणि त्यानंतर प्रेमात रुपांतर झाले. जेव्हा सानिया आणि शोएब भेटले तेव्हा ते दोघेही समदु:खी होते. पण लग्न केल्यावर मात्र दोघांचे आयुष्य पालटून गेले.