टी २० विश्वचषकातील कालची भारत-पाकिस्तानची हायव्होल्टेज मॅच भारताने जिंकली आणि भर मैदानावर अश्रू आणि आनंदाने नाचले गेले. विराट कोहलीने पाकिस्तानला भारतासमोर गुढगे टेकविण्यास भाग पाडले. सामना जिंकवून देणाऱ्या विराटलाही अश्रू अनावर झाले होते. विराटने या सामान्यानंतर पत्नी अनुष्का शर्माशी फोनवर संवाद साधल्याचे म्हटले आहे.
लाखभर चाहत्यांच्या उपस्थितीत झालेला हा आतापर्यंतचा भारत-पाकिस्तान यांच्यामधील थरारक सामना ठरला. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश ( ४) , रोहित ( ४), सूर्यकुमार यादव ( १५) व अक्षर पटेल ( २) असे चार फलंदाज ३१ धावांवर माघारी परतले. विराट कोहली व हार्दिक पांड्या या जोडीवरच आता टीम इंडियाची सर्व भीस्त होती. भारताला अखेरच्या १० षटकांत ११५ धावांची गरज असताना पाहून विराटने गिअर बदलला. १२व्या षटकात मोहम्मद नवाजच्या एका षटकात त्याने तीन खणखणीत षटकार खेचले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना १५ षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. भारताला ३० चेंडूंत ६० धावा विजयासाठी हव्या होत्या.
विराट आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त सर्वाधिक ३७४९* धावा करणारा फलंदाज ठरला, त्याने रोहितला ( ३७४१) मागे टाकले. दरम्यान हार्दिकनेही ट्वेंटी-२०त १०००+ धावा व ५०+ विकेट्स असा अष्टपैलू विक्रम नोंदवला. ट्वेंटी-२०त असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला. शाहिद आफ्रिदी, शाकिब अल हसन, ड्वेन ब्राव्हो, थिसारा परेरा, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नबी, केव्हीन ओ'ब्रायन यांनी हा पराक्रम केला आहे.
विराटने पाकिस्तानची जीरवली. विराटने ५३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या. अश्विनच्या विजयी चौकारानंतर एकच जल्लोष झाला. विराटने आकाशाकडे एक बोट दाखवत सेलिब्रेशन केलं आणि त्याच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं. हार्दिक, भुवनेश्वर, सूर्यकुमार सर्वच विराटच्या दिशेने धावले. कर्णधार रोहित शर्माने तर चक्क विराटला खांद्यावर उचलून घेतले.
“मी माझी पत्नी अनुष्काबरोबर बोललो. ती फार आनंदात आहे. इथे लोक फार आनंदात आहेत. ते मला फोन करुन आनंद व्यक्त करत आहेत. नेमकं काय करायचं मला कळत नाहीय., असे ती म्हणाल्याचे विराट म्हणाला. बाहेर नेमकं काय सुरु आहे मला ठाऊक नाही. मैदानावर जाऊन खेळायचं एवढच माझं काम आहे, असे आपण तिला म्हणाल्याचे विराटने सांगितले.