मेलबर्न : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने आहेत. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. भारतीय गोलंदाजांनी कर्णधार रोहित शर्माचा निर्णय योग्य ठरवत शानदार गोलंदाजी केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम डावाच्या दुसऱ्याच षटकांत बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने बाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवून भारताला चांगली सुरूवात करून दिली. पाकिस्तानने २० षटकांत ८ बाद १५९ धावा करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले आहे.
अर्शदिप सिंगने त्याच्या तिसऱ्या षटकांत आसिफ अलीला बाद करून पाकिस्तानला सातवा झटका दिला. त्याने एकूण ४ षटकांत ३ बळी पटकावले. अर्शदीपने आपल्या पहिल्याच विश्वचषकाच्या सामन्यात केवळ ३२ धावा देऊन संघाला ३ बळी मिळवून दिले. अर्शदीप सिंगच्या या कामगिरीचे कौतुक भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने केले आहे. तसेच सेहवागने ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानला डिवचलं आहे. "अर्शदीप सिंगला पाहताना पाकिस्तान. ये सरदार है असरदार. #IndvsPak" अशा आशयाचे ट्विट करून पाकवर निशाणा साधला आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ आज ७ फलंदाज, एक अष्टपैलू व तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरत असल्याचे रोहितने सांगितले. पण, प्रत्यक्ष संघ पाहिल्यास पाच फलंदाज, १ अष्टपैलू, २ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज संघात दिसत आहेत. रोहितने आज मैदानावर पाऊल ठेवताच मोठा विक्रम नावावर केला. ८ टी-२० वर्ल्ड कप खेळणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. रोहितने २००७ ते २०२२ मध्ये खेळलेल्या ८ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ३४ सामन्यांत ३८.५०च्या सरासरीने ८४७ धावा केल्या आहेत. त्यात ८ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद ७९ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शान मसूद, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, हैदर अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ,
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"