Harbhajan Singh, India vs Pakistan T20 World Cup 2024: टी२० वर्ल्डकप मध्ये रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. संथ खेळपट्टीवर टीम इंडियाला १९ षटकात सर्वबाद ११९ धावाच करता आल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत पाकिस्तानवर ६ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू वासिम अक्रमने पाकिस्तानी फलंदाजांवर तोंडसुख घेतलं. पण काही पाकिस्तानी खेळाडूंनी पातळी सोडून वादग्रस्त टीका केली. त्यावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने त्यांचा खरपूस समाचार घेतला.
भारताकडून अर्शदीप सिंग शेवटचे षटक टाकण्यासाठी आला होता. त्यावेळी अर्शदीपला १८ धावांचा बचाव करायचा होता. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमल कॉमेंट्री करत असताना अर्शदीपबद्दल बोलला. अर्शदीप सिंग २० वे षटक टाकत आहे. तो या षटकात भरपूर धावाही देऊ शकतो, असे कामरान अकमल म्हणाला. इतकेच नव्हे तर अर्शदीपबद्दल बोलताना त्यांनी शिख धर्माचा अपमानही केला. त्यावरून हरभजनने अकमलला प्रत्युत्तर दिले.
"तुला अशा गोष्टी बोलताना लाज वाटली पाहिजे कामरान अकमल. तुझ्या घाणेरड्या तोंडातून शिखांबद्दल बोलण्याआधी तू शिखांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे होतास. तुमच्या आई-बहिणींची अब्रू आम्ही शिखांनी वाचवली आहे. घुसखोरांपासून आम्ही तुमचा बचाव केला. थोडा आदर दाखव. असं बोलताना तुला शरम वाटायला हवी," अशा शब्दांत हरभजन सिंगने कामरान अकमलला सुनावले.
दरम्यान, कामरान अकमलने ज्या अर्शदीप सिंगला कमी लेखण्याचा प्रयत्न केला त्यानेच भारताला विजय मिळवून दिला. त्याने ४ षटकात ३१ धावा देत १ बळी घेतला. इमाद वसीमला त्याने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात केवळ ११ धावा दिल्या आणि पाकिस्तानला ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.