Win Predictor, India vs Pakistan, T20 World Cup 2024: क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. त्यामुळे या खेळात कधीही कोणताही प्रकार घडू शकतो. एखादा सामना जिंकायचा असेल तर त्यासाठी केवळ चांगली कामगिरी आणि नशीबाची साथ असून चालत नाही, तर विजय मिळवण्याची जिद्द असावी लागते. जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर पराभवाच्या छायेत असलेला संघदेखील विजयश्री खेचून आणू शकतो. असाच काहीसा प्रकार पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाने केला. सामना कोण जिंकेल, याबाबत सामना सुरु असताना प्रेक्षकांचा कौल विचारला गेला त्यावेळी भारताच्या बाजूने केवळ ८ टक्के लोकांनी मत दिले होते. पण अखेरीस जिद्दीच्या जोरावर भारताने सामना जिंकून दाखवला.
विजयाचा टक्का कसा वाढला?
प्रथम फलंदाजी करताना भारताने ११९ धावांपर्यंत मजल मारली आणि पाकिस्तानला १२० धावांचे माफक आव्हान दिले. जेव्हा पाकिस्तानचा डाव सुरु असताना ४९ चेंडूत ४९ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी सामना कोण जिंकणार असा सवाल करण्यात आल्यावर भारताच्या बाजुने केवळ ८ टक्के लोकांची मते होती. पण सामना सुरु झाल्यानंतर हळूहळू गोष्टी बदलू लागल्या. बाबरची विकेट गेल्यानंतर भारताच्या विजयाच्या टक्केवारीत वाढ झाली. १४व्या षटकापर्यंत रिझवान खेळपट्टीवर तग धरून होता. तोवर प्रेक्षकांचा कौल पाकिस्तानच्या पारड्यात होता. रिझवानच्या विकेटनंतर हळूहळू प्रेक्षकांनी भारताच्या विजयाचा सुरु केला आणि भारताच्या विजयाची टक्केवारी ३६ पर्यंत पोहोचली.
शेवटच्या तीन षटकांमध्ये ३० धावांची आवश्यकता असताना हळूहळू भारताच्या विजयाची शक्यता अधिक वाढत गेली आणि टक्केवारीही वाढतच गेली. रोहित शर्माची नेतृत्वातील चतुराई आणि बुमराहसह सर्वच गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी यांच्या जोरावर भारताने ८ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंतचा प्रवास केला आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला.