Join us  

शीख समुदायाबद्दल अपशब्द; हरभजन सिंगचा संताप, अखेर पाकिस्तानी खेळाडूचा माफीनामा

India vs Pakistan T20 World Cup 2024 : भारताने ट्वेंटी-२० विश्वचषकात सातव्यांदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 12:23 PM

Open in App

Harbhajan Singh : ट्वेंटी-२० विश्वचषकात रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला. संथ खेळपट्टीवर टीम इंडियाला १९ षटकांत सर्वबाद केवळ ११९ धावाच करता आल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत पाकिस्तानवर ६ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने पाकिस्तानी फलंदाजांवर तोंडसुख घेतले. पण काही पाकिस्तानी खेळाडूंनी पातळी सोडून वादग्रस्त टीका केली. त्यावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने त्यांचा खरपूस समाचार घेतला. मग वाद चिघळताच पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक खेळाडू कामरान अकमलने भज्जीची माफी मागितली आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या सामन्यातील शेवटचे षटक अर्शदीप सिंग टाकत होता. यावेळी सामन्याचे विश्लेषण करताना कामरान अकमलची जीभ घसरली. शेवटच्या षटकात अर्शदीपला १८ धावांचा बचाव करायचा होता. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमल सामन्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेत बोलत असताना अर्शदीपबद्दल त्याने भाष्य केले. अर्शदीप सिंग २० वे षटक टाकत आहे. तो या षटकात भरपूर धावाही देऊ शकतो, असे कामरान अकमल म्हणाला. इतकेच नव्हे तर अर्शदीपबद्दल बोलताना त्याने शिख धर्माचा अपमानही केला. त्यावरून हरभजनने अकमलला प्रत्युत्तर दिले.

हरभजन सिंगचा संताप "तुला अशा गोष्टी बोलताना लाज वाटली पाहिजे कामरान अकमल. तुझ्या घाणेरड्या तोंडातून शिखांबद्दल बोलण्याआधी तू शिखांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे होतास. तुमच्या आई-बहिणींची अब्रू आम्ही शिखांनी वाचवली आहे. घुसखोरांपासून आम्ही तुमचा बचाव केला. थोडा आदर दाखव. असे बोलताना तुला लाज वाटायला हवी," अशा शब्दांत हरभजन सिंगने कामरान अकमलला सुनावले.

कामरान अकमलचा माफीनामा हरभजन सिंगने संताप व्यक्त करताच अकमलने माफी मागितली. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, मी अलीकडे केलेल्या एका टिप्पणीचा मला खेद वाटतो आणि मी अगदी मनापासून याबद्दल माफी मागतो. हरभजन सिंग आणि शीख समुदायाने मला माफ करावे. माझे शब्द अयोग्य आणि अनादर करणारे होते. मला जगभरातील शीख लोकांबद्दल अत्यंत आदर आहे आणि कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. मला खरच माफ करा. 

टॅग्स :हरभजन सिंगभारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तानअर्शदीप सिंग