America US to host India v Pakistan T20 World Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपचा सामना होतो तेव्हा सगळ्या जगाचं लक्ष त्याकडे असतं. भारत-पाक यांच्यातील ICC T20 विश्वचषक 2024 चा बहुचर्चित सामना अमेरिकेतील होणार असल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा सामना अमेरिकेतील न्यूयॉर्क या अतिशय गजबजलेल्या शहरात होऊ शकतो अशी माहिती आहे. टी२० विश्वचषकातील हा सर्वात मोठा सामना असेल. हा दणकेबाज क्रिकेट सामना न्यूयॉर्क जवळील लाँग आयलँडमध्ये असलेल्या स्टेडियममध्ये होऊ शकतो.
गार्डियन या न्यूज वेबसाईटच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि स्थानिक आयोजन समितीद्वारे आज (१५ डिसेंबर) विश्वचषकाच्या वेळापत्रकावर स्वाक्षरी केली जाणार आहे. अनिवासी भारतीय आणि अमेरिकेतील क्रिकेटची आवड असलेल्या इतरांना या सामन्याचा भरपूर आनंद घेता यावा यासाठी असे नियोजन असणार आहे. अहवालानुसार, T20 विश्वचषक 2024 च्या वेळापत्रकात काही बदल आयत्या वेळी शक्य आहेत, परंतु इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया त्यांचे सर्व गट सामने कॅरेबियन देशांमध्येच खेळतील अशीही माहिती आहे.
T20 विश्वचषक 2024 चा फायनल बार्बाडोसमध्ये?
ICC चे निरीक्षक गेल्या पंधरवड्यापासून कॅरिबियनमधील विश्वचषकाच्या ठिकाणांचा दौरा करत आहेत, ज्याचा शेवट या आठवड्यात गयाना येथे झाला. त्यांच्या तपासणी दरम्यान, या निरीक्षकांना असे आढळले की काही सुधारणा आणि स्टेडियमचा विस्तार अद्याप आवश्यक आहे, परंतु त्यांना कोणत्याही मोठ्या समस्या आढळल्या नाहीत. अंतिम सामन्याचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु ते बार्बाडोसमध्ये असण्याची शक्यता आहे. 2007 साली वन डे विश्वचषक आणि 2010 साली टी२० स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन केले होते.