इस्लामाबाद: टी-२० वर्ल्डकपला (T20 World Cup) अवघ्या काहीच दिवसांत सुरुवात होणार आहे. यातील भारत आणि पाकिस्तानमधील सामन्याकडे अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागले असून, २४ ऑक्टोबर रोजी हा सामना होणार आहे. अलीकडेच न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तानसोबत खेळायला नकार दिला होता. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. संयुक्त अरब अमिराती येथे होत असलेल्या टी-२० वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ रवाना झाला आहे.
बाबर आझम याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ टी-२० वर्ल्डकप खेळायला यूएईमध्ये दाखल होत आहे. याशिवाय बाबर आझमचाही हा पहिलाच टी-२० वर्ल्ड कप असणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कामगिरीकडे आणि नव्या नेतृत्वाकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानचा संघ टी-२० वर्ल्ड कप खेळण्यासाठी रवाना होत असल्याची माहिती बाबर आझमने ट्विट करत दिली. तसेच यासोबत संपूर्ण संघाचा फोटोही शेअर केला आहे.
यूएईसाठी रवाना होत आहोत
यूएईसाठी रवाना होत आहोत. अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमचा पाठिंबा सर्वांत महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. आपल्या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. सहकार्य करत राहा. प्रार्थना करत राहा आणि विश्वास कायम ठेवा, असे ट्विट बाबर आझमने केले आहे. यासोबत पाकिस्तान झिंदाबाद असा हॅशटॅगही जोडला आहे. यावर, अनेक युझर्सनी प्रतिक्रिया केल्या आहेत. अनेकांनी पाक संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काही चाहत्यांनी सल्लेही दिले आहेत. एका चाहत्याने तर भारताविरोधात जिंकला नाहीत, तर परत येऊ देणार नाही, अशी तंबीही दिलीय.
दरम्यान, जे खेळाडू कायम उत्तम खेळ खेळतात, असे नाही की प्रत्येक सामन्यात तेच उत्तम कामगिरी करतील. या सामन्यांमध्ये पाकिस्तानला भारताचा पराभव करायचा असेल तर सातत्य कायम ठेवणे आवश्यक आहे, असा सल्ला जावेद मियांदाद यांनी दिला आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष रमिझ राजा यांनाही त्यांनी सामना जिंकण्यावर लक्ष केंद्रीत असले पाहिजे, असे म्हटले आहे.