मेलबर्न-
श्रीलंका आणि नामीबिया यांच्यातील सामन्यापासून टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियात टी-२० स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि भारताची या स्पर्धेतील सुरुवात २३ ऑक्टोबरपासून होणार आहे. भारतीय संघाचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना मेलबर्नच्या ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पण या सामन्यावर आता हवामानाचं संकट ओढावलं आहे.
मेलबर्नमध्ये २३ ऑक्टोबर म्हणजेच रविवारी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हा अंदाज जवळपास ७० टक्क्यांपर्यंत वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. तसंच आयसीसी देखील संकटात सापडलं आहे. कारण भारत-पाकिस्तान सामना सुपरहिट ठरणार यात काही शंका नाही. त्यात जर हा सामना झाला नाही तर आयसीसीला मोठं नुकसान होऊ शकतं.
मेलबर्न क्रिकेट स्टेडियमची या सामन्यासाठीची सर्व तिकीटं याआधीच विकली गेली आहेत. तिकीटासाठी चाहत्यांची नुसती झुंबड उडाली होती. पण आता पावसानं सामन्यात व्यत्यय आणळा तर चाहत्यांची पुरती निराशा होण्याची शक्यता आहे. पावसामुळे स्टेडियममधील जवळपास १ लाख लोकांची निराशा होईल.
कसं असेल मेलबर्नचं वातावरण?weather.com च्या अंदाजानुसार २३ ऑक्टोबर म्हणजेच रविवारी मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता आहे. रविवारी मेलबर्नमध्ये दुपारच्या सुमारास वातावरण १८ डिग्री इतकं राहील. याच वेळी पावसाचा अंदाज ७० टक्के इतका वर्तविण्यात आला आहे. ६ मिमी इतका पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. फक्त दिवसाच नव्हे, तर रात्री देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान हवेचा वेग १५ केएमपीएच इतका असू शकतो.
पाऊस पडला तर सामन्याचं काय?ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये क्वालिफाय स्टेज आणि सुपर-१२ राऊंडसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणास्तव सामना होऊ शकला नाही. तर दोन्ही संघांमध्ये १-१ गुण दिला जाईल. पाऊस थांबला तर कमी षटकांचा सामना खेळवला जाऊ शकतो. दोन्ही इनिंगमध्ये किमान ५-५ षटकं टाकली जातील अशी परिस्थिती असणं गरजेचं आहे. तशी परिस्थिती नसल्यास सामना रद्द केला जाऊ शकेल आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण दिला जाईल.
ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारत आणि पाकिस्तानचा संघभारत- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर.अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदिप सिंग, मोहम्मद शमी. स्टँडबाय खेळाडू- श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर
पाकिस्तान- बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस राऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, फखर जमां स्टँडबाय खेळाडू- मोहम्मद हारिस, उस्मान कादिर आणि शाहनवाज दहानी.