भारताचा धडाकेबाज फलदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आज (23 अक्टूबर) पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक ठोकत इतिहास रचला. कोहलीने 53 चेंडूंचा सामना करत एकूण सहा चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत कोहलीने 48 धावा तर फक्त 10 चेंडूत चौकार आणि षटकारांच्या मदतीनेच केल्या. हे टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील कोहलीचे 11वे अर्धशतक आहे.
टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत विराट कोहलीने आता रोहित शर्मा मागे टाकले आहे. आजच्या सामन्यानंतर आता त्याच्या 3794 धावा झाल्या आहेत. तर रोहितच्या नावार 3741 टी-20 इंटरनॅशनल धावांची नोंद आहे.
दिलशानचा विक्रम मोडला -यासामन्यानंतर, कोहलीने श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानला मागे टाकत T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. या स्पर्धेत 900 धावांचा टप्पा पार करणारा विराट पहिला भारतीय आणि जगातील तिसरा क्रिकेटर ठरला आहे. कोहलीने 22 सामन्यांच्या 20 डावांत 84.27 च्या सरासरीने एकूण 927 धावा फटकावल्या आहेत.
सामन्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव करत स्पर्धेत जबरदस्त सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 8 बाद 159 धावा केल्या होत्या. यानंतर, मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात अत्यंत वाईट झाली होती. भारताने अवघ्या 31 धावांतच 4 फलंदाज गमावले होते. मात्र, विराट आणि हार्दिक पंड्याने वादळी खेळी करत अखेरच्या चेंडूवर भारताला विजय मिळवून दिला. हार्दिक पंड्याने गोलंदाजीत 3 बळी घेतल्यानंतर 37 चेंडूत 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.