T20 World Cup 2021, India vs Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढतीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. जवळपास दोन वर्षांनी हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेतील इतिहास पाहता पाकिस्तानला एकदाही टीम इंडियाला पराभूत करता आलेलं नाही, परंतु यंदा हा इतिहास बदलेल असा दावा पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंकडून केला जात आहे. India vs Pakistan सामना म्हटला की दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या अपेक्षांचे प्रचंड ओझं घेऊन खेळाडू मैदानावर उतरलेले असतात. पण, यावेळी टीम इंडियावरच अधिक दडपण असल्याचा दावा पाकिस्तानचा माजी खेळाडू तन्वीर अहमदनं ( Former Pakistan cricketer Tanvir Ahmed) केला आहे. या दडपणामुळेच बीसीसीआयनं महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) मेंटॉर म्हणून निवड केल्याचा दावाही अहमदनं केला आहे.
२०१९च्या वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच होता आणि त्यानं १५ ऑगस्ट २०२०ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता धोनी पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत दिसला अन् तोही मार्गदर्शकाच्या भूमिकेत. २४ ऑक्टोबरला टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा पहिला सामना खेळेल तो पाकिस्तानविरुद्ध. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा सामना होणार आहे. या सामन्यावर अहमद यानं त्याचं मत व्यक्त केलं. भारतीय संघ जगात अव्वल असला तरी त्यांची सध्याची कामगिरी ही निराशाजनक झाल्याचे अहमद म्हणाला.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा विराट कोहलीचा निर्णय हा हेच सांगतो की तो प्रचंड दबावाखाली आहे आणि त्यामुळे संघावरही दडपण आहे, असे सांगताना अहमदनं टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला. संघात निवडलेल्या बऱ्याच खेळाडूंना आयपीएल २०२१त साजेशी कामगिरी करता आलेली नाही, याकडे त्यानं लक्ष वेधलं. तो म्हणाला,''भारतीय संघ कागदावर वरचढ आहे, यात काहीच शंका नाही. त्यांनी जगभरात वर्चस्व राखणारी कामगिरी केली आहे, परंतु त्यांचा सध्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. मला सर्वप्रथम विराट कोहलीबद्दल बोलायला आवडेल. तो प्रचंड दडपणात आहे आणि म्हणूनच त्यानं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले.''
''कदाचित भारतीय संघावरही दडपणाचे मोठं ओझं आहे आणि त्यामुळेच त्यांनी महेंद्रसिंग धोनीची मेंटॉर म्हणून नियुक्ती केली. आयपीएल २०२१मधील भारतीय संघाची कामगिरी पाहिल्यास ते टॉप १०मध्येही नव्हते. आर अश्विन व रवींद्र जडेजा यांचीही कामगिरी निराशाजनक झाली. त्यामुळेच त्यांच्यावर दडपण आहे,''असेही तो म्हणाला.