India Playing XI vs Pakistan: भारत-पाकिस्तान लढतीपूर्वी दोन्ही संघांचे कर्णधार नेमकं काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमनं ( Babar Azam) टीम इंडियाला आव्हान देणारे १२ शिलेदार जाहीर केले. त्यानंतर विराट कोहलीची ( Virat Kohli) पत्रकार परिषद झाली. टीम इंडियाही त्यांचे शिलेदार जाहीर करेल असे वाटले होते, परंतु विराटनं मी प्लेइंग इलेव्हन सांगणार नाही, हे स्पष्ट करून सर्वांची उत्सुकता संपवली. पण, त्यानं हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) हा पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही आणि खेळलाच तर गोलंदाजी करेल का?; या प्रश्नावर स्पष्ट मत मांडले.''आम्ही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी अंतिम ११ शिलेदार निवडले आहेत, परंतु मी ती नावं आज सांगणार नाही. हे खेळाडू निवडण्यामागे आम्ही बराच विचार केला. सर्व खेळाडू आयपीएल खेळूनच येथे दाखल झाले आहेत आणि सर्व चांगल्या फॉर्मात आहेत. आता त्याची अंमलबजावणी मैदानावर करायची आहे,'' असे विराटनं सांगितलं.
कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर विराट म्हणाला, ''मी आधीच सर्वकाही सांगितले आहे, त्यामुळे आणखी काही सांगण्यासारखे नाही. पाकिस्तानविरुद्धचा सामना हा आमच्यासाठी अन्य सामन्यासारखाच आहे. त्यामुळे कोणताही सामना खेळताना किंचितसे दडपण असतेच. व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून परिस्थितीनुसार खेळायला हवे आणि प्रतिस्पर्धी कोण आहे याचा विचार करायला नको.''
हार्दिक पांड्याविषयी काय म्हणाला कोहली?''हार्दिक पांड्या आता तंदुरुस्त आहे आणि तो किमान दोन षटकं नक्की टाकेल. त्यामुळे काही षटकं टाकण्यासाठी आम्ही दुसरा पर्यायाचाही विचार करत आहोत. मी नेहमीच त्याच्याकडे एक फलंदाज म्हणून पाहिले आणि पाठींबा दिला आणि तेच आताही करू. त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास दिसत आहे आणि काही षटकं फेकण्यासाठी तो तयार आहे,''असे विराटनं स्पष्ट केलं.
''पाकिस्तानविरुद्धच्या स्पर्धेतील इतिहासाबद्दल आम्ही चर्चा करत नाही. आमच्यासाठी येणारा दिवस महत्त्वाचा आहे. आम्ही त्या सामन्यांत चांगला खेळ केला आणि म्हणून विजय मिळवला. पाकिस्तान हा तगडा संघ आहे आणि त्यांच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत. अशा संघाविरुद्ध खेळताना चांगली रणनीती आखायला हवी आणि त्याचा अवलंबही व्हायला हवा,''असेही विराट म्हणाला.
असा असू शकतो संभाव्य संघ - लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रिषभ पंत, हार्दिक पांड्या/शार्दूल ठाकूर, आर अश्विन/रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार/वरुण चक्रवर्थी