India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू चांगलेच ट्रोल झाले होते. कारण भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू इंग्लंडमधील हुक्का पार्लरमध्ये दंगा करत होते, असे म्हटले जात होते. भारताची टेनिस सम्राज्ञी आणि तिचा पती व पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक एका हुक्का पार्लरमध्ये दिसले होते. या दोघांसह पाकिस्तानचे काही महत्वाचे खेळाडूही यावेळी हुक्का पार्लरमध्ये असल्याचे म्हटले गेले होते.
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ हुक्का पार्लरमध्ये गेल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला, असे सोशल मीडियावर म्हटले गेले. पण एवढे पुरावे दिल्यानंतर पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ खेळाडूंची बाजू लावून का धरत आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
यावेळी चाहत्यांनी या दोघांना चांगलेच धारेवर धरले होते. पण भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू हुक्का पार्लरमध्ये नाही तर हॉटेलमध्ये होते, असे स्पष्टीकरण पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने दिले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत 7 वेळा आमने- सामने आले आहेत. त्यात प्रत्येक वेळी भारतानेच विजय मिळवला आहे. मात्र रविवारी मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या. या पराभवाचं खापर पाकिस्तानच्या चाहत्यांनी सानिया मिर्झावर फोडले. भारतविरुद्धच्या लढतीच्या एकदिवस आधी सानिया पती शोएबसह एका कॅफेमध्ये डिनरसाठी गेली होती. यावेळी पाकिस्तानचे काही खेळाडूही होते. त्यावरून नेटिझन्सने पाक खेळाडूंसह सानियावरही टीका केली.
पाकिस्तानच्या संघाचे स्पष्टीकरण देताना यावेळी सांगितले की, " भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे कोणतेही खेळाडू उशिरापर्यंत बाहेर नव्हते. सर्वच खेळाडू वेळेमध्ये संघाच्या हॉटेलमध्ये होते. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू बाहेर होते, हे म्हणणे चुकीचेच आहे."