India vs Pakistan : भारतीय संघानं २०२१मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला, इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत आघाडी घेतलीय आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सेंच्युरियन येथे पहिल्या कसोटी विजयाची नोंद केली. तेच दुसरीकडे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभव अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनं चाहत्यांना निराश केलं. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धचा पराभव हा भारतीय चाहत्यांच्या अधिक जीवारी लागणारा ठरला. वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचा भारताविरुद्धचा पहिलाच विजय ठरला. पाकिस्ताननं १० विकेट्स राखून विजय मिळवला.
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत या सामन्याबद्दल मत मांडले. भारतीय संघ भित्र्यासारखी खेळली आणि या पराभवाची सल नेहमी टोचत राहणार, असे मत शास्त्रींनी व्यक्त केले. भारतानं प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी १७.५ षटकांत एकही विकेट न गमावता हे लक्ष्य पार केले.
शास्त्री म्हणाले,''त्या दिवशी पाकिस्तानने चांगला खेळ केला आणि न्यूझीलंडविरुद्धचा त्यांचा खेळही उत्तम होता. आम्ही भित्र्यासारख खेळलो. आमच्या खेळातूनही ते दिसत होतेच. मुक्तपणे खेळणं सोडून आम्ही खूपच विचार करून खेळताना दिसलो. तुम्ही संघर्ष करून हरला असता तर त्याचं एवढं वाईट वाटलं नसतं, परंतु तुम्ही भित्र्यासारखं खेळलात. विचार करून करून खेळत होता म्हणून जास्त फटका बसला. वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात असा पराभव पत्करल्यानंतर पुढील मार्ग खडतर बनणारच.''