भारत-पाकिस्तान यांच्यातल्या आशिया चषकाच्या लढतीत भारताचे वर्चस्व राहिले. आता १४ ऑक्टोबरला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील लढतीत IND vs PAK महामुकाबला होणार आहे. २०२४ मध्ये ४ ते ३० जून या कालावधीत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे आणि यजमान अमेरिका येथे भारत-पाकिस्तानची लढत होईल.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ चे यजमानपद वेस्ट इंडीज आणि अमेरिका यांना मिळालेले आहे. या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत ज्यासाठी आयसीसीने अमेरिकेत ठिकाण निश्चित केले आहे. न्यू यॉर्क शहराच्या ३० मैल पूर्वेकडील ३४ हजार आसन क्षमतेच्या स्टेडियमवर हा सामना आयोजित केला जाईल. मॅनहॅटनच्या पूर्वेस सुमारे ३० मैल पूर्व मेडोमध्ये ९३० एकर पसरलेल्या आयझेनहॉवर पार्कमध्ये हे स्टेडियम उभारले जाईल.
सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, "ब्रॉन्क्सच्या बरोमध्ये व्हॅन कॉर्टलँड पार्कमध्ये अशाच प्रकारच्या स्टेडियमच्या बांधकामासाठी ICC आणि न्यूयॉर्क शहराच्या अधिकार्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर काही महिन्यांत ही घोषणा होणार आहे. उद्यानाच्या आजूबाजूला राहणार्या काही स्थानिकांनी आणि त्याच उद्यानाच्या बाहेर असलेल्या क्रिकेट लीगंपैकी एकाचा जोरदार विरोध केल्यानंतर शहराच्या अधिकार्यांना ब्रॉन्क्सची योजना सोडण्यास भाग पाडले गेले होते. आयसीसी इव्हेंटसाठी यूएसए मीडिया हक्क डॉलरच्या मूल्याच्या बाबतीत शीर्ष ४ देशांमध्ये असल्याचे मानले जाते. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी सह-यजमान म्हणून यूएसएची नियुक्ती ही आयसीसीची अशीच एक सकारात्मक कृती होती.”