IND vs PAK, Women's T20 World Cup 2024 महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय महिला संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. हरमनप्रीत कौर संघाची कर्णधार तर स्मृती मंधाना संघाची उपकर्णधार असणार आहे. या स्पर्धेचे सुधारित वेळापत्रकही आता जाहीर करण्यात आले आहे. बांगलादेशातील राजकीय गोंधळानंतर विश्वचषक स्पर्धा बांगलादेशातून हलविण्यात आली असून आता संयुक्त अरब अमिराती (UAE) यंदाचे यजमान असणार आहेत. स्पर्धेतील २३ सामने दुबई आणि शारजाह येथे खेळवले जातील. या स्पर्धेत भारत विरूद्ध पाकिस्तान सामनाही रंगणार आहे.
भारत-पाकिस्तान सामना कधी?
भारताचा पहिला सराव सामना रविवारी (२९ सप्टेंबर) दुबईत वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील महिला संघ मंगळवारी (१ ऑक्टोबर) दुबईत दुसऱ्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी सामना करेल. स्पर्धेची सुरुवात ३ ऑक्टोबरला होणार असून भारतालाचा पहिला सामना ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध होईल. त्यानंतर भारताला ६ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया ९ ऑक्टोबरला श्रीलंकेशी खेळेल. तर १३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना रंगेल.
दुबईमध्ये १७ ऑक्टोबरला पहिला उपांत्य सामना आणि १८ ऑक्टोबरला दुसरा उपांत्य सामना होणार आहे. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस आहे. २० ऑक्टोबर रोजी दुबई येथे विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे.