- सुनील गावस्कर नॉटिंघम ते मँचेस्टर प्रवासादरम्यान हवामान चांगले होते. ढगाळ वातावरण होते पण पावसाने हजेरी लावली नाही. लँकेशायरमध्ये प्रवेश करताच चांगले ऊन पडले होते. हवामानाच्या अंदाजानुसार सुरुवातीच्या खेळात पावसाचा व्यत्यय जाणवणार नाही. भारत-पाकच्या क्रिकेट चाहत्यांसाठी ही सुखद वार्ता आहे.भारत-पाक सामन्यात रोमांचक अनुभव येतो. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांपैकी पाकला दोन लढतीत पराभवाचा सामना करावा लागला तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना भारताविरुद्ध विजय क्रमप्राप्त झाला आहे. फलंदाजीत सातत्य नसल्यामुळे पाकसाठी हा विजय सोपा असणार नाही. गोलंदाजीतही आमीरचा अपवाद वगळता कुणीही प्रभावी ठरू शकले नाहीत. दोन वर्षांआधी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकला जेतेपद मिळवून देणारा आमीरच होता. पाक संघ यावेळी देखील त्याच्याकडून सुरुवातीला भेदक मारा करीत भारताची आघाडीची फळी बाद करण्यास उत्सुक असेल.५० षटकांच्या सामन्यात भारत अधिक संतुलित आणि भक्कम जाणवतो. संघाकडे अनुभवासह पाकच्या तुलनेत शिस्तबद्ध क्षेत्ररक्षक आहेत. षटकांची संख्या घटविण्यात आली, तर मात्र सामना कुणाच्याही बाजूने फिरू शकेल. त्यामुळे मँचेस्टरवर पावसाने वक्रदृटी करू नये, अशी प्रार्थना भारतीयांना वरुण देवतेकडे करावी लागेल.शिखर संघात नसल्यामुळे विजय शंकरसारख्या युवा खेळाडूला मोक्याच्या क्षणी कौशल्य दाखविण्याची संधी मिळू शकते. तो फलंदाजी, गोलंदाजीत उपयुक्त आहेच पण चांगला क्षेत्ररक्षकदेखील आहे. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी याला संधी दिल्यास युजवेंद्र चहल हा एकमेव फिरकी गोलंदाज संघात असेल. पाकविरुद्ध विजयासाठी भारताने अंतिम ११ जणांमध्ये याहून अधिक बदल करण्याची गरज नाही.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India Vs Pakistan World Cup 2019: मँचेस्टरवर पावसाची वक्रदृष्टी होऊ नये- गावस्कर
India Vs Pakistan World Cup 2019: मँचेस्टरवर पावसाची वक्रदृष्टी होऊ नये- गावस्कर
हवामानाच्या अंदाजानुसार सुरुवातीच्या खेळात पावसाचा व्यत्यय जाणवणार नाही. भारत-पाकच्या क्रिकेट चाहत्यांसाठी ही सुखद वार्ता आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 2:43 AM