India Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान यांच्यातील सर्वात महत्वाचा सामना उद्या मँचेस्टर येथे खेळला जाणार आहे. या सामन्याकडे साऱ्यांचे डोळे लागलेले आहेत. सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाची एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला कर्णधार विराट कोहली आला होता. यावेळी तो नेमकं काय म्हणाला, ते वाचा...
या सामन्यामध्ये कोहलीपुढे पाकिस्तानाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरचे मोठे आव्हान असेल, असे म्हटले जाते. पण कोहलीला मात्र, असे काहीच वाटत नाही. याबाबत कोहली म्हणाला की, " मोहम्मद आमीरवर मी लक्ष केंद्रीत केलेले नाही. संघातील अकरा खेळाडू कशी कामगिरी करतात, यावर संघाचा विजय अवलंबून असतो. माझ्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे."
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याविषयी कोहली म्हणाला की, " भारत-पाकिस्तन सामन्याला चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. एक वेगळेच वातावरण तयार होते. पण आमच्यासाठी मात्र हा एक सामनाच असतो. कारण आम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू आहोत. त्यामुळे आमच्यासाठी पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड हे देश सारखेच असतात. "
पाहा खास व्हिडीओ
भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर'भारत आणि पाकिस्तान सामनाकाही तासांवर येऊन ठेपला आहे. या सामन्यात भारतीय संघ विश्वचषकातील विजयी परंपरा कायम राखणार की पाकिस्तानचा संघ इतिहास लिहीणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. या सामन्यात 'X फॅक्टर' नेमका काय ठरणार, याची उस्तुकता साऱ्यांना असेल. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद आमीर, अशी काही नावं तुमच्या ओठांवर आपसूकच येतील. पण या सामन्यात कोणताही खेळाडू 'X फॅक्टर' ठरणार नाही. कारण या महासंग्रामात यशस्वीपणे दडपण कसे हाताळता, हा 'X फॅक्टर' ठरणार आहे. त्यामुळे जोशमध्ये जर तुम्ही होश हरवून बसलात तर सामना तुमच्या हातून निसटू शकतो. त्यामुळे बिनधास्त खेळा, पण क्रिकेटच्या पावित्र्याला धक्का लागेल, असे मात्र करू नका.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात खेळाडूंवर जबरदस्त दडपण असते. पण हाच सामना जेव्हा विश्वचषकात खेळवला जातो, तेव्हा हे दडपण बऱ्याच पटींने वाढलेले असते. त्यावेळी खेळाडू एखादी नवीन गोष्ट करताना बराच विचार करतात. हा विचार करत असताना प्रतिस्पर्धी संघ ती गोष्ट करून यश आपल्या पदरात पाडून घेते, असे पाहायला मिळते. त्याचबरोबर बऱ्याचदा एखादी चूक घडते आणि त्यानंतर खेळाडू निराश होतात. काही वेळा खेळाडू निराशेच्या गर्तेत अडकतात आणि त्यामधून बाहेर त्यांना पडता येत नाही. त्यामुळे जेवढे दडपण तुम्ही ओढावून घ्याल, तेवढीच तुमची कामगिरी चांगली होऊ शकणार नाही.
भारत-पाकिस्तान सामन्याचे दडपण काय असते, हे सर्वात जास्त अनुभवले असेल ते सचिन तेंडुलकरने. कारण आतापर्यंत विश्वचषकात झालेल्या ६ सामन्यांपैकी सचिन पाच सामन्यांमध्ये खेळला आहे. त्याचबरोबर पाच पैकी तीन सामन्यांमध्ये त्याने सामनावीराचा पुरस्कारही पटकावला आहे.
तुम्हाला कदाचित सचिनची एक गोष्ट माहिती नसेल. ही गोष्ट आहे २०११ साली झालेल्या विश्वचषकाची. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मोहालीत महत्वाचा सामना रंगणार होता. दोन्ही संघांनी कसून सराव केला. पण दोन्ही संघांतील मोठा फरक ठरला तो सचिन. कारण सचिनने सामन्याच्या पूर्वसंध्येला संघाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सचिनने दडपण या गोष्टीवर मार्गदर्शन केले होते.
'तुमच्याकडे कोहली आहे तर आमच्याकडे आमीर' रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. या सामन्यात कोणता खेळाडू दमदार कामगिरी करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. भारतीय चाहत्यांना सर्वात जास्त विश्वास कर्णधार विराट कोहलीवर आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचे खेळाडू वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरला सर्वात जास्त पसंती देत आहेत.
मँचेस्टर येथे भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये पाऊस पडू शकतो, असे म्हटले जात आहे. पाऊस पडल्यावर वातावरण वेगवान गोलंदाजांसाठी पोषक ठरते. पावसानंतर जर भारताची फलंदाजी असेल तर त्यांच्यावर आमीर भारी पडू शकतो, असे म्हटले जात आहे. कारण आतापर्यंतच्या विश्वचषकात आमीरने भेदक मारा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आमीरने पाच विकेट्स मिळवले होते. त्यामुळे आमीरची भूमिका भारताविरुद्धच्या सामन्यात महत्वाची ठरू शकते.
आज भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी सराव केला. त्यावेळी पाकिस्तानचे चाहते मोठ्या संख्येना उपस्थित होते. त्यावेळी, तुमच्याकडे जर कोहली असेल तर आमच्याकडे आमीर आहे, अशी भावना पाकिस्तानच्या चाहत्यांच्या मनात होती. बऱ्याच प्रसारमाध्यमांना देण्यात येणाऱ्या बाईटमध्येही त्यांनी हा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले.