Join us  

India vs SA Test Series: राहुल द्रविड गुरुजींच्या शाळेत विराट कोहलीवर सारं लक्ष; संघातील वातावरण हसतंखेळतं ठेवण्याचा प्रयत्न, Video 

India vs SA Test Series: मायदेशातील पत्रकार परिषदेत वादाचे फटाके फोडून कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) अँड कंपनी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 1:58 PM

Open in App

India vs SA Test Series: मायदेशातील पत्रकार परिषदेत वादाचे फटाके फोडून कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) अँड कंपनी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली. क्वारंटाईन, कोरोना चाचणी या सर्व फॉरमॅलिटी पार पाडून टीम इंडियानं सरावालाही सुरूवात केली. पण, कोहली आणि बीसीसीआय यांच्या वादाचा फटका भारतीय संघाला बसू नये याची काळजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याला घ्यावी लागत आहे. विराटसोबत काम करण्याच्या पहिल्याच संधीत द्रविडची तारेवरची कसरत सुरू झाली आहे. पण, अनुभवाची शिदोरी पाठिशी कायम असलेला मुरब्बी द्रविड संघाला योग्य दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. टीम इंडियाच्या पहिल्याच सराव सत्रात राहुल द्रविडनं कर्णधार  विराट कोहलीसाठी क्लास भरवला अन् त्याला फलंदाजीचे काही बारकावे समजावून सांगितले. BCCIनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

२६ डिसेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या कसोटीला सेंच्युरियन येथे सुरूवात होणार आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत अद्याप एकही कसोटी मालिका जिंकलेला नाही. अशात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली हा इतिहास बदलण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. या दौऱ्यावर विराटच्या कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. २०१८मध्ये सेंच्युरियन येथे विराटनं १५३ धावांची दमदार खेळी केली होती.  पण, विराटच्या या खेळीनंतरही भारतीय संघाला १३५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आता त्या पराभवाची परतफेड करण्यास विराट उत्सुक आहे. 

पाहा व्हिडीओ..

विराटसाठी हा दौरा कर्णधार म्हणून महत्त्वाचा आहेच, परंतु फलंदाज म्हणूनही त्याची कसोटी आहे. त्यानं वर्कलोडमुळे ट्वेंटी-२० संघाचं कर्णधारपद सोडले होते. मागील दोन वर्षांत त्याला आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. २०१९मध्ये तिनं बांगलादेशविरुद्ध अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. टीम इंडियाच्या मागील आफ्रिका दौऱ्यावर विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यानं ३ कसोटींत ४७च्या सरासरीनं २८६ धावा केल्या होत्या. त्यात एक शतक व एक अर्धशतक होते. पण, आफ्रिकेनं ही मालिका २-१ अशी जिंकली होती. विराटनं दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत ५ कसोटीत ५५ च्या सरासरीनं ५५८ धावा केल्या आहेत.  

भारतीय संघ -विराट कोहली ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, प्रियांक पांचाळ, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज ( India’s Test squad: Virat Kohli (Captain), KL Rahul (vice-captain), Mayank Agarwal, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane, Priyank Panchal, Shreyas Iyer, Hanuma Vihari, Rishabh Pant (wicket-keeper), Wriddhiman Saha (wicket-keeper), R Ashwin, Jayant Yadav, Ishant Sharma, Mohd. Shami, Umesh Yadav, Jasprit Bumrah, Shardul Thakur, Md. Siraj)  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीराहुल द्रविड
Open in App