दाम्बुला, दि. 20 - श्रीलंकेनं दिलेल्या 216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात केलीय. शिखर धवन आणि रोहित शर्मानं दणकेबाज खेळी करत पहिल्या विकेटसाठी 23 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्माचा बळी गेला. मात्र मैदानावर आलेल्या कोहलीनं लौकिकाला साजेसा खेळ करत सामन्यावर ताबा मिळवला. धवन आणि कोहली या जोडीनं मैदानावर श्रीलंकन गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलंय.विराट कोहलीनं 10 चौकार आणि एक षटकार लगावत 70 चेंडूंत 82 धावा केल्या होत्या. तर धवननंही जबरदस्त खेळीचं दर्शन घडवत 90 चेंडूंत 20 चौकार आणि 3 षटकार लगावत 132 धावा कुटल्या आहेत. शिखर धवननं 71 चेंडूंत 100 धावा करत शतक पूर्ण केलंय. एकदिवसीय कारकिर्दीतील शिखरचं हे 11वं शतक आहे.
मोठी खेळी करण्याच्या नादात श्रीलंकेच्या फलंदाजांनी आपल्या विकेट भारतीय गोलंदाजांना बहाल केल्या. मलिंगा आणि मॅथ्यूज ही जोडी शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर राहिल्यानं श्रीलंकेनं 200 धावांचा टप्पा ओलांडला. तरीही भारतीय गोलंदाजांनी त्यांना 216 धावांवरच रोखलं. भारताकडून अक्षर पटेलने 3 बळी घेतले, त्याला केदार जाधव, जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी 2 बळी घेत भारताला चांगलं यश मिळवून दिलं. तर किमान दोन सामने जिंकून 2019मध्ये होणा-या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत चंचूप्रवेश करण्याच्या इरादा होता, मात्र तो सफल झाला नाही. 30 सप्टेंबरपूर्वी क्रमवारीत अव्वल आठ संघांमध्ये स्थान मिळवलेल्या संघांना वर्ल्ड कपच्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळेच वन-डेत दोन सामने जिंकून वर्ल्ड कपच्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याच्या श्रीलंकेचा प्रयत्न असेल.