IND vs SL 2nd T20I Int Live Score : शिखर धवननं एकाकी झुंज दिल्यामुळे टीम इंडियानं दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेसमोर १३३ धावांचे लक्ष्य ठेवले. शिखरनं ४० धावांची खेळी केली, त्याला देवदत्त पडिक्कल ( २९) व ऋतुराज गायकवाड ( २१) या पदार्पणवीरांची साथ मिळाली. संजू सॅमसनचं अपयश हे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली. पण, चर्चेत राहिली ती वनिंदू हसरंगानं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची कॉपी केलेली स्टाईल...
श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, नितिश राणा आणि चेतन सकारिया या चार खेळाडूंनी पदार्पण केले. ऋतुराज गायकवाडनं शिखर धवनसह पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. देवदत्त आणि शिखर यांनाही फटकेबाजी करता येत नव्हती. दोघांची ३२ धावांची भागीदारी अकिला धनंजयानं संपुष्टात आली. देवदत्त व संजू सॅमसन यांना मोठी खेळण्याची संधी होती, परंतु त्यांनाही खुलून फटके मारता आले नाही.
वनिंदु हसरंगा यानं टाकलेल्या १६व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर देवदत्तनं सुरेख रिव्हर्स स्वीप मारून चौकार मिळवला, परंतु पुढच्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. सॅमसनही ( ७) पुढच्या षटकात धनंजयाच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारताला २० षटकांत ५ बाद १३२ धावा करता आल्या.
वनिंदू हसरंगानं केली कॉपी...