सेंच्युरियन - भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा दाणादाण उडाली आहे. विशेषता: फिरकी माऱ्यापुढे खेळताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्याचे पहायला मिळाले आहे. चहल-कुलदीप जोडीनं आठ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भारतीय फिरकी गोलंदाजासमोर आफ्रिकेचा डाव 118 धावांत संपुष्टात आला. चहलने पाच बळी घेतले तर कुलदीपनं तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भुवनेश्वर आणि बुमराहनं प्रत्येकी एक बळी घेतला. आफ्रिकेच्या सात फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. 32.2 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा डाव 118 धावांत संपुष्टात आला.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवत 118 धावांमध्ये आफ्रिकेचा खुर्दा उडवला. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत आफ्रिकेला सुरुवातीच्या षटकांत चार झटके दिले. त्यांच्या 4 विकेट्स केवळ 14 षटकांत गेल्या होत्या. त्यावेळी धावफलकावर केवळ 53 धावाच होत्या. झोंडो (25), जेपी ड्युमिनी(25), मॉरीस (14), हाशिम अमला (23), डिकॉक (20),कर्णधार एडिन मार्करम (8) आणि डेविड मिलर (0) यांना आपल्या लौकीकास साजेशा खेळ करता आला नाही. कुलदीप यादवने एडिन मार्करम आणि डेविड मिलरला बाद केले तर भुवनेश्वर कुमारने हाशिम अमला (२३) तर युझवेन्द्र चहलने डिकॉकला (२०) बाद करत आफ्रिकेला अडचणीत टाकले होते.
भारत या मालिकेत 1-0 असा आघाडीवर आहे. पहिला एकदिवसीय सामना सहज जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाला दुखापतीने ग्रासले आहे. कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. उर्वरित एकदिवसीय सामन्यांसाठी एडेन मार्कराम याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रहाणेने वाँडरर्स कसोटीतील फॉर्म कायम राखत शानदार फलंदाजी केली आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याला वगळणे मोठी चूक असल्याचे सिद्ध केले. त्यानेही सहज सुंदर फलंदाजी केली. कोहली-रहाणे जोडी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे पिसे विखुरताना बघितल्यानंतर आनंद झाला.डर्बनच्या तुलनेत सेंच्युरियनची खेळपट्टी वेगवान आहे. त्याचसोबत हा सामना दिवसा खेळला जाणार आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या मा-याची चांगली कल्पना असून ते यजमान संघाला मालिकेत पुनरागमन करण्याची संधी देणार नाहीत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये सहा वन-डे सामन्याची मालिका खेळवली जात आहे.
असा आहे भारतीय संघ: रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल