कर्णधार मिताली राजच्या कारकिर्दीला वीस वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाल्याचा आनंद टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवून साजरा केला. भारतीय महिलांनी 164 धावांचे लक्ष्य 41.4 षटकांत केवळ 2 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. प्रिया पुनिया आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला. भारताने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
मितालीची ऐतिहासिक कामगिरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ देशाचे प्रतिनिधित्व करणारी मिताली ( पुरुष व महिला) चौथी खेळाडू ठरली. या विक्रमात सचिन तेंडुलकर ( 22 वर्ष 91 दिवस) अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर सनथ जयसूर्या ( 21 वर्ष व 184 दिवस) आणि जावेद मियाँदाद ( 20 वर्ष 272 दिवस) यांचा क्रमांक येतो. मितालीनं 20 वर्ष 105 दिवस भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
नाणेफेक जिंकून आफ्रिकेची प्रथम फलंदाजी
लॉरा वोल्व्हार्ट ( 39) आणि मॅरीझन्ने कॅप्प ( 54) वगळता आफ्रिकेच्या अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीनं 33 धावांत 3 विकेट्स घेतल्या. तिला शिखा पांडे ( 2/38), एकता बिस्त ( 2/38) आणि पूनम यादव (2/33) यांची उत्तम साथ लाभली. स्मृती मानधनानं दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतल्यानं प्रिया पुनियाला वन डे संघात पदार्पणाची संधी मिळाली. आफ्रिकेचा संपूर्ण संघ 164 धावांत तंबूत परतला.
पदार्पणातच प्रियाचे अर्धशतक, जेमिमाची फटकेबाजी
लक्ष्याचा पाठलाग करताना जेमिमा रॉड्रीग्ज आणि प्रिया यांनी पहिल्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. जेमिमानं 65 चेंडूंत 55 धावांची ताबडतोड खेळी केली. जेमिमा माघारी परतल्यानंतर प्रियानं सामन्याची सूत्र हाती घेतली आणि पदार्पणातच अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. पदार्पणात वन डे सामन्यात अर्धशतक झळकावणारी प्रिया ही सातवी भारतीय महिला फलंदाज ठरली. प्रियानं 124 चेंडूंत 8 चौकारांसह नाबाद 75 धावा केल्या.
Web Title: India vs South Africa, 1st ODI : India Wins by 8 Wickets against South Africa Women
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.